Diwali Padwa 2024: आज १ नोव्हेंबर या दिवशी आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाणार असून आज लक्ष्मीपूजनही केले जाणार आहे. मात्र उद्या २ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही तिथी आहे. कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष असे महत्त्व असते. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. या स्नानानंतर तयार होऊन पत्नी आपल्या पतीला ओवाळते. पतीला औक्षण केले जाते. या वेळी पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा, अस्थात दिवाळी पाडवा किवा बलिप्रतिपदा या तिथीला नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळसण म्हणतात. दिवाळी पाडव्याला पत्नीच्या माहेरकडील मंडळी जावयाला आपल्या घरी निमंत्रित करतात. पत्नी आपल्या पतीला तेलाने मालीश करते. त्यानंतर स्नान घालून त्याचे औक्षण करते. त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घालतात. त्यानंतर त्याला अहेर दिला जातो.
दिवाळी पाडवा हा शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, चांदे इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशी दागिन्यांची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीकडे भेटवस्तूची मागणी करते. आज बाजारात देखील सोन्याच्या नवनवीन वस्तू, दागिने पाहायला मिळत असतात.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचे रुप घेऊन उदार बळीजाराला पाताळात धाडले होते. बळीपूजा या नावाने प्रसिद्ध असलेली बलिप्रतिपदा कार्तिक मासाच्या प्रतिपदेला म्हणजेच यंदा १ नोव्हेंबर या दिवशी आहे. बलिप्रतिपदा किंवा बळीपूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतिक म्हणून साजरी केली जाते.
प्रतिपदा तिथी शुक्रवार, ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी सुरू होत आहे. तर, प्रतिपदा तिथीची समाप्ती ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०८ वाजून २१ मिनिटांनी होत आहे.
Dislciamer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.