Diwali : दिवाळीची पहिली आंघोळ कधी? अभ्यंगस्नान कसे करावे, महत्व आणि कथा जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Diwali : दिवाळीची पहिली आंघोळ कधी? अभ्यंगस्नान कसे करावे, महत्व आणि कथा जाणून घ्या

Diwali : दिवाळीची पहिली आंघोळ कधी? अभ्यंगस्नान कसे करावे, महत्व आणि कथा जाणून घ्या

Published Oct 30, 2024 11:23 AM IST

Narak Chaturdashi 2024 Abhyanga Snan Significance : दिवाळी हा एकच सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. नरकचतुर्दशी दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ असते. जाणून घ्या या वर्षी दिवाळीची पहिली आंघोळ कधी आहे? अभ्यंगस्नान कसे करावे? महत्व आणि कथा.

दिवाळीची पहिली आंघोळ अभ्यंगस्नान कसे करावे
दिवाळीची पहिली आंघोळ अभ्यंगस्नान कसे करावे

दिवाळी हा एकच सण वेगवेगळी वैशिष्ट्ये घेऊन पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. यातील नरकचतुर्दशी दिवशी सामान्यपणे ' पहिली आंघोळ ' असते. या दिवशी पहाटे चंद्रोदयानंतर आणि सकाळी सुयर्योदयापूर्वी उठावे अंगाला सुवासिक तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा आहे. या वर्षी नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ ३१ ऑक्टोबर रोजी आहे.

अभ्यंगस्नान कसे करावे

दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करावं. 'तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचं उच्चाटन होतं, अशी धर्मात मान्यता आहे. अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे. त्यानंतर फराळाचं पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्य मिळून एकत्र ग्रहण करावे.

थंडीमुळे शरीरात रुक्षता वाढत असते. येणारे चार महिने रुक्षतेचे असतात. याकाळात मणक्याचे, कंबरेचे दुखणे, सायटिका आदी अस्थी संधीचे त्रास, दमा, पोटामध्ये कोरडेपणा येऊन पोट मंद मंद दुखने, पोट फुगणे, घसा कोरडा होणे, त्वचेत कोरडेपणा येऊन खाज सुटणे, सोरायसिस, केस गळणे आदी विविध त्रास निर्माण होण्याची शक्यता वाढते. शिवाय ज्यांना हे त्रास पूर्वीच आहेत, त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

यासाठी, अंगाला रोज तेल लावणे, जेवणात तेलाचे किंवा तुपाचे प्रमाण अधिक ठेवणे आवश्यक आहे. या काळात, प्रभाते उठावे, मुख्य कामे आटोपून, व्यायाम करावा, उटणे लावावे, अभ्यंग करावा मग ५-१० मिनिटे थंडीत थोडे कुडकुडावे व मग गरम पाण्याने मस्त आंघोळ करावी. नंतर यथेश्च दिवाळीचा फराळ करावा. अशी आपल्याकडे परंपरा आहे.

अभ्यंगस्नानामागे पौराणिक कथा

पौराणिक कथेप्रमाणे नरकासुर नावाचा एक बलाढ्य राजा उन्मत्त झाला आणि त्यांनी सर्वत्र उच्छाद मांडला तेव्हा इंद्राने नरकासुरापासुन सुटकेसाठी भगवान कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी कृष्णाकडे वर मागितला की, आजच्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरक यातना होऊ नयेत. भगवान श्रीकृष्णाने ते मान्य केले आणि या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरू झाली. अशी ही अभ्यंगस्नानाबाबत सांगितल्या जाणाऱ्या अनेक कथांपैकी एक कथा आहे.

 

 

 

Whats_app_banner