हिंदू धर्मात साजरा होणारा महत्वासा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी किंवा दीपावली या सणाची प्रत्येकाला उत्सुकता असते. दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ओळखला जातो. दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी तसेच फुलांच्या तोरणं-माळेनी सजवले जाते.
दिवाळीची सुरवात धनतेरसने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते, त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार केला जातो.
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी.
समुद्रमंथनाच्या वेळी अमृत सह- नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह पाच गाई उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे, कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे, शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.