Dhanteras 2024 In Marathi : दीपोत्सवाच्या पाच दिवसांच्या उत्सवात देवी लक्ष्मीचे घरी आगमन होते. हा सण धन-संपत्ती, वैभव, सुख-समृद्धीचे प्रतीक मानला जातो. दिवाळीची सुरूवात ही वसुबारसेपासून होते. वसुबारसेला गायीची पूजा केली जाते. पुढच्या दिवशी अर्थात धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. अश्चिन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी.
या दिवशी घरातील धान्याचीही पूजा केली जाते. तसेच या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. धन्वंतरींचीही पूजा केली जाते. भारतीय पुराणात असं म्हटलंय, की देवी लक्ष्मी या दिवशी कलश घेऊन प्रकट झाली. त्यामुळे देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते आणि लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता केली जाते आणि या ५ दिवसांतही स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. या वेळी दिवा लावण्याचेही विशेष महत्त्व आहे.
यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होत आहे. या दिवशी सोनं-चांदीही खरेदी केली जाते, खरेदीला खास मुहूर्त आणि महत्व असतं. धनत्रयोदशीला दिवे लावण्यास सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या पहिल्या दिवशी १३ दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी यमदीप प्रज्वलित करण्याचीही परंपरा आहे. यमदीप प्रज्वलित केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते असे मानले जाते. यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी चार ठिकाणी दिवे लावणे खूप शुभ मानले जाते.
ईशान्य दिशा : वास्तूनुसार घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशेला देवी-देवतांचे स्थान मानले जाते. दीपोत्सवाच्या काळात या दिशेने स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच याठिकाणी दिवा लावावा. धनत्रयोदशीच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यात ५ दिवे लावा.
पूर्व दिशा : धनत्रयोदशीच्या दिवशी घराची पूर्व दिशा स्वच्छ करून संध्याकाळी मोठ्या दिव्यात तीळाचे तेल टाकून दिवा लावावा.
उत्तर दिशा : पाच दिवसांच्या दिवाळी सणात घराची उत्तर दिशा देखील पूर्णपणे स्वच्छ करावी. या दिशेला तुपाचा दिवा लावावा. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी घरात वास करण्यास मदत करते.
ब्रह्मस्थान : घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे ब्रह्मस्थान. हा घराचा मध्यवर्ती भाग आहे म्हणजेच घरातील चारही दिशेला जाणारी जागा. येथे कोणत्याही प्रकारचा कचरा साचू देऊ नका. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी ब्रह्म स्थानावर तुपाचा दिवा लावावा.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.