Dhantrayodashi 2024: यावर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर रोजी अनेक शुभ योगायोगांमध्ये साजरी केली जाणार आहे. दिवाळीचा सण धनत्रयोदशीपापासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि देव धन्वंतरी यांची पूजा केली जाते. यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्रयोग आणि वैधृति योग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीच्या निमित्ताने पूजा आणि खरेदीचे कार्य समृद्धिदायक मानले जाते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी देवांचे वैद्य आणि भगवान विष्णूचे अंश अवतार धन्वंतरी देव यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी पूजेच्या वेळी दीपप्रज्वलन केले जाते. जाणून घेऊया धनत्रयोदशीला किती दीप प्रज्वलित करणे शुभ आहे?
धनत्रयोदशीच्या दिवशी १३ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी केलेले शुभ कार्य १३ पट अधिक शुभ फळ देते. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी १३ दिवे प्रज्वलित करून धन, ऐश्वर्य, सुख आणि वैभवाचा आशीर्वाद मिळविणे शुभ मानले जाते.
देवी लक्ष्मी, श्रीगणेश, कुबेर देवता आणि धन्वंतरी देव यांची पूजा केल्यानंतर सर्वप्रथम घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजाजवळ यमदीप प्रज्वलित करावा. यानंतर डस्टबिनजवळ दक्षिण दिशेला दिवा लावावा. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांवर २ दिवे लावा. त्यामुळे घराची सकारात्मकता वाढते. यानंतर माता तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा. छतावर दिवा लावावा. उरलेले दिवे मंदिरावर, खिडकीवर आणि घराच्या कोपऱ्यावर प्रज्वलित करावेत. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
या वर्षी मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. तिथीची सुरुवात सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपासून होत आहे. तर धनत्रयोदशीची समाप्ती ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ०१ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. मात्र, उदया तिथीनुसार, धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर या दिवशीच साजरी केली जाईल.
पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त २९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत असणार आहे. हे पाहता पूजा करण्यासाठी सुमारे १ तास २३ मिनिटांचा वेळ उपलब्ध असणार आहे. यादिवशी प्रदोष काळ १७:३८ ते २०:१३ मिनिटापर्यंत राहील.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.