Devotees drank AC water as Charanamrut: मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये वृंदावन मंदिरातील भाविकांनी नकळत एसीचे गळणारे पाणी पवित्र जल मानून ते प्राशन केल्याचा प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर भक्त आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली. यानंतर अंधश्रद्धा आणि मंदिर व्यवस्थापनाकडून योग्य संवादाची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
भारतासारख्या धर्म आणि देवावर श्रद्धा बाळगणाऱ्या देशातील बहुतांश लोकांचा नशिबावर मोठा विश्वास आहे. याचे एक उदाहरण वृंदावनमध्ये पाहायला मिळाले. येथे भगवान श्रीकृष्णाचे चरणामृत किंवा पवित्र पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, रांगेत उभ्या असलेल्या हत्तीच्या प्रतिकृतीतील गळणारे ते 'पवित्र पाणी' खरेतर एसीचे पाणी आहे, याची कल्पना मात्र कोणालाही नव्हती.
वृंदावनमधील मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील एका व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक भाविक भिंतीवरील हत्तीच्या शिल्पातील तोंडातून खाली गळणारे पाणी पिण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत.
काही भाविक पाणी गोळा करण्यासाठी कपांचा वापर करत होते, तर काहींनी "पवित्र पाणी" म्हणून मानलेल्या या पाण्याचे काही थेंब मिळविण्यासाठी ओंजळ धरून ठेवली होती.
मात्र, मंदिरात पाणी वाहून जाण्यासाठी पाइप लावण्यात आले असून जेथून पाणी येते त्या बाहेरील बाजून हत्तीची प्रतिकृती लावण्यात आली आहे, असे वृत्त जागरणने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील अनेक पुजाऱ्यांनीही हे पाणी म्हणजे पवित्र जल असल्याचा इन्कार केला आणि सांगितले की, हे पाणी ठाकूरजींच्या पायाचे नसून ते एसीचे गळणारे पाणी आहे.
मंदिराच्या आतील व्हिडिओमध्ये काही पुजारी भाविकांना हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. तुम्ही जे पाणी पित आहात ते पवित्र जल नसून खरंतर ते एसीचं पाणी आहे. परंतु भाविकांचा पुजाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. हे पवित्र जलच आहे असे त्या भाविकांना वाटत होते. या भाविकांनी पुजारांच्या माहितीकडे चक्क दुर्लक्ष करून हे पाणी पिण्यासाठी किंवा ते अंगावर शिंपडण्यासाठी रांगा लावल्या.
इंटरनेटवरील प्रसिद्ध 'द लिव्हर डॉक'ने आपल्या फॉलोअर्सना एसीचे पाणी पिऊ नये असे आवाहन केले. द लिव्हर डॉकने म्हटले, "कूलिंग आणि वातानुकूलन प्रणालीमध्ये बुरशीसह अनेक संक्रमण करणाऱ्या अनेक जतूंची उत्पत्ती होत असते. ते एक प्रकारे नरकासारखेच आहे."
एसीमधून गळणारे पाणी पिणे धोकादायक का ठरू शकते?
एसीमधून गळणारे पाणी आरोग्यासाठी धोकादायक असते. एसीचे पाणी मूलत: हवेतून गोळा झालेल्या घटकांचे मिश्रण असते. याचा अर्थ त्यात धूळ, परागकण आणि इतर हवेतील प्रदूषक असू शकतात. हे दूषित पदार्थ आतील हवेतून घेतले जातात आणि युनिटमध्ये जमा होणाऱ्या पाण्यात ते गेळा होतात.
एसी युनिट्स ओलसर असतात आणि बॅक्टेरिया, बुरशी आणि तत्सम जंतूंसाठी उत्पत्तीची ठिकाणे असतात. एसी सिस्टममध्ये असलेल्या पाण्यात असे संक्रमण करणारे जंतू वाढू शकतात. यामुळे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींसाठी सेवन केल्यास त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
एसीच्या पाण्यात युनिटमधील रेफ्रिजरेटर, वंगण आणि धातूंमधील रसायने असू शकतात. हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी) किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) सारख्या रेफ्रिजरंटकधीकधी गळती होऊ शकते. यामुळे हानिकारक संयुगांसह हे गोळा झालेले पाणी दूषित होते. कॉम्प्रेसरची देखभाल करण्यासाठी वापरले जाणारे वंगण देखील पाण्यात मिसळू शकतात.
कालांतराने, अंतर्गत घटक गंजतात, संभाव्यतः शिसे, तांबे किंवा ॲल्युमिनियम सारखे जड धातू पाण्यात मिसळतात. हे पाणी प्राशन केल्यास ते विषारी बनू शकते. अगदी किरकोळ रासायनिक पदार्थ मिसळले गेले तर त्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, विशेषत: दीर्घकाळ किंवा वारंवार सेवनाने याची शक्यता अधिक वाढते.
एसीचे पाणी पिण्याच्या पाण्याप्रमाणे गाळण्याची प्रक्रिया किंवा शुद्धीकरण प्रक्रियांमधून जात नाही. परिणामी, या पाण्यात अत्यावश्यक खनिजे राहत नाहीत. तसेच AC प्रणालीमधील धातू किंवा इतर हानिकारक पदार्थ पाण्यात असू शकतात.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. X वर या व्हिडिओला ३.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओखाली अनेक प्रतिक्रियांचा पाऊसच पडला होता. काहींच्या मते हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आहे, तर काहींनी तेथे नोटीस न लावण्याबाबत प्रश्न उपस्थित करत ही मंदिर व्यवस्थापनाची चूक असल्याचे सांगितले.
एकाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेले मन हे मिथक, अंधश्रद्धा, द्वेष आणि विभाजन यांचे जन्मस्थान आहे. हे लोकशाहीला धोकादायक आहे आणि झुंडीच्या मानसिकतेला प्रोत्साहन देते,”
“ही भक्ती नाही; जर त्यांनी हे पाणी प्यायले नाही, तर ज्यांनी केले त्यांच्या तुलनेत त्यांना पुरेसे आशीर्वाद मिळणार नाहीत, अशी भिती लोकांच्या मनात आहे!!”
“कोणाला माहित होते की थोडासा एसी दैवी अनुभवात बदलू शकतो? थोडंसं थांबा, ते त्याला 'दैवी हायड्रेशन' असंही म्हणतील!”
“आम्ही भारतात सामाजिक, धार्मिक मान्यता असलेली कोणतीही वस्तू विकू शकतो. रस्त्याच्या कडेला पडलेला दगड सुद्धा - फक्त त्याला देवाशी जोडून घ्या आणि किमान २०-३० लोकांनी त्याबद्दल धार्मिक चर्चा करा, बस्स.”
“किमान मंदिर ट्रस्टने लोकांना सावध करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती. मंदिर प्रशासनाने तेथे बोर्ड लावला पाहिजे होता,”
तथ्य लोकांच्या लक्षात आणून देणे हे व्यवस्थापनाचे काम आहे, असेही अनेकांनी सुचवले.