आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावास्येला दिपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रात या अमावस्येला गतहारी या शब्दाचा अपंभ्रश होऊन गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं.
यावर्षी आषाढ अमावस्या आज दि.४ ऑगस्ट रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. यालाच आपण दीप अमावस्या , किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात, तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
आषाढ अमावस्येला दिपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते
पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात आज दि.४ ऑगस्ट रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ही अमावस्या दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी 0३ वाजून ५० मिनिटांनी सुरु झाली असून, आज दि.४ ऑगस्टला दुपारी ४ वाजून ४२ मिनिटांनी संपन्न होईल.
दिप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने प्रज्वलित करा. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.
पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दिपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्विकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.
अमावस्येच्या दिवशी तुम्ही प्रदोषकाळात तुमच्या पितरांसाठी दिवा लावू शकता. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सूर्यास्त होईल आणि त्यानंतर जेव्हा अंधार पडू लागतो तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी दिवा लावू शकता.