Datta Jayanti 2024 In Marathi : मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंतीही साजरी केली जाते. सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे म्हणतात. जाणून घ्या दत्त जयंती कधी आहे? पूजा विधी, मुहुर्त, महत्व आणि मान्यता.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. असे मानले जाते की, जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुवार हा दत्ताचा वार मानला जातो.
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल. तसेच, रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनी संपेल. इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती १४ डिसेंबर रोजी साजरी होणार असून, श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. उदया तिथीनुसार १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे.
भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत. भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे. त्यामुळे, दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तिन चेहरे आणि सहा हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरू होते, त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख-समृद्धी लाभते.
दत्तात्रेय जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. देवघर स्वच्छ करा. भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करा. त्यांना गंगाजलाने स्नान घालावे. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा. जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा अवश्य वाचावी. तसेच शेवटी आरती करावी. या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका. पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमाप्रार्थना करावी. गरजूंना काहीतरी दान करा.
दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून तसेच पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन-किर्तन केले जाते. तसेच, महाराष्ट्रातील सर्व श्रीस्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसाचा सप्ताह होतो. यंदा ९ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत हा सप्ताह असून, या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र पारायण, प्रहर, माळ जप केले जाते.
संबंधित बातम्या