Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2024: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेलं स्वराज्य सांभाळण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. स्वराज्याचं रक्षण करतानाच संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा या या ‘स्वराज्यरक्षक’ राजाबद्दल जाणून घेऊया काही गोष्टी...
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला होता. लहानपणापासूनच ते वडील छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर योद्धे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले होते. आजही त्यांच्या शौर्याचे किस्से वाचायला, ऐकायला मिळतात.
छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणापासूनच राजकारणाची जाण होती आणि त्यांनी अनेक प्रसंगी आपले कौशल्य दाखवले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि आईचे नाव सईबाई होते. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांतच त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने म्हणजेच जिजाऊंनी केले होते.
ऐतिहासिक नोंदींनुसार छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विद्याविशारद तर होतेच, पण अत्यंत धुरंदर राजकारणी देखील होते. त्यांनी फार लहान वयातच राजकारणातील बारकावे भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले, तर याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल, या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्यावेळी सोबत नेले होते.
कालांतराने त्यांनी मराठी आणि संस्कृतसह इतर अनेक भाषांमध्ये प्रभुत्व संपादन केले होते. छत्रपती संभाजी महाराज यांना साहित्यातही विशेष रस होता. साहित्य निर्माण करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी अनेक साहित्यकृती लिहिल्या, ज्या आजही प्रासंगिक आहेत. वडिलांच्या सन्मानार्थ त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ रचले.
१६६५ मध्ये मुघल आणि मराठे यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. यानंतर ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते. त्यावेळी संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली आणि काही सहकाऱ्यांना पदावरून काढून टाकले आणि नवीन मंत्रिमंडळ बनवले. मथुरेचे रहिवासी असलेले कवी कलश यांची त्यांनी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यांना मराठी भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. मात्र, ते खूप कुशाग्र होते.
शिवरायांच्या सहकाऱ्यांनी हा स्वतःचा अपमान समजला आणि संभाजी महाराजांविरुद्ध अंतर्गत बंडखोरीचा गजर केला. या बंडामुळे आणि कटकारस्थानामुळे संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. यानंतर त्यांना कैद करण्यात आले. त्यांचा गंभीर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. परंतु, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याचं शौर्य दाखवणाऱ्या शिवरायांच्या छाव्याने मरणाच्या दारात असूनही हार मानली नव्हती. मात्र, काळाने त्याचं चक्र अखेर फिरवलं आणि स्वराज्याचा हा रक्षक काळाच्या स्वाधीन झाला.
संबंधित बातम्या