महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महारांना ओळखले जाते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच महाराजांची शौर्याचे आणि साहसाचे कौतुक वाटते. महाराजांचे आयुष्य म्हणजे एक शौर्यगाथा आहे. तसेच महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्यदेखील अत्यंत साहसी आणि प्रभावी आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच छ. संभाजी महाराजदेखील शूरवीर होते. आपल्या कालखंडात त्यांनी अनेक साहसी पराक्रम करत जनतेला एक पराक्रमी वारसा दिला आहे. आजही लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तितक्याच भक्तिभावाने पूजतात.
उद्या म्हणजेच १९ जून २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांची जीवनगाथा पाहणार आहोत. सांगायचे झाले तर एका वर्षात महाराजांच्या दोन जयंती साजऱ्या केल्या जातात. छ. संभाजी महाराजांच्या जन्म तारखेविषयी असलेला वाद यामागील कारण आहे. महाराजांच्या जन्म तारखेविषयी अनेक लोकांना संभ्रम आहे. त्यामुळे काही लोक तारखेनुसार १४ मे रोजी तर काही लोक तिथीनुसार महाराजांची जयंती साजरी करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छ. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. वयाच्या अवघ्या अडीच वर्षात असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी संभाजी महाराजांचे संगोपन केले होते. जिजाऊंच्या देखरेखीत संभाजी महाराजांचीदेखील बालपणापासूनच एक तेजस्वी व्यक्तीमत्व म्हणून जडणघडण झाली होती. संभाजी महाराज हे धाडसी असण्यासोबतच अत्यंत हुशार होते. त्याकाळात त्यांना तब्बल ८ भाषांचे ज्ञान होते. महाराजांना इतिहासात छावा म्हणून संबोधले जाते.
छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे ते पुत्र होते. सईबाई या महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. तसेच संभाजी महाराजांचे एक बंधूदेखील होते. त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते. राजराम महाराज हे राणी सोराबाईंचे पुत्र होते. तसेच शूरवीर संभाजी महाराजांचा विवाह राणी येसूबाई यांच्यासोबत झाला होता. त्यांना छत्रपती शाहू महाराज हे पुत्रदेखील होते.
संभाजी महाराज आपले वडील शिवरायांसारखेच शूरवीर होते. कोणत्याही कठीण परिस्थितीतून बुद्धी चातुर्याने मार्ग काढण्याची कला त्यांना अवगत होती. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी महाराजांना पुरंदरच्या तहानिमित्त मिर्झाराजे यांच्या छावणीत वास्तव्य करावे लागेल. याकाळातच औरंगजेबाने चलाखी दाखवत महाराजांना आणि संभाजी राजेंना आपल्या नजरकैदेत ठेवले होते. मात्र महाराज इतके हुशार आणि बुद्धिवान होते की या परिस्थितूनसुद्धा त्यांनी सुखरुप मार्ग काढत आपली आणि बाळ राजेंची सुटका केली होती. त्यांनंतर पुढे ३० जुलै १६८० मध्ये स्वराज्याची सत्ता छत्रपती संभाजी राजेंवर सोपविण्यात आली होती. याकाळात महाराजांना आपल्या मंत्रिमंडळाबाबत संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी दक्षता घेत कवी कलश यांना आपल्या मंत्रीमंडळाचे सल्लागार बनवले होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे खास मित्र होते. महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. कलश यांच्या साथीने महाराजांनी एक प्रभावी शासन प्रस्थापित केले होते.
संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात मोठे यश मिळवत एक प्रभावी इतिहास रचला आहे. महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने जवळपास आठ लाख मुघल सैन्याचा सामना केला होता. या प्रत्येक युद्धात मुघलांचा पराभव करत उल्लेखनीय यश मिळविले होते. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर असणारे हिंदूसुद्धा महाराजांचे अत्यंत ऋणी आहेत. कारण औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात आला तेव्हा उत्तर भारतातील हिंदू लोकांना त्याठिकाणी आपले राज्य स्थापन करण्यास मुबलक वेळ मिळाला होता. इतिहासाच्या अभ्यासानुसार संभाजी महाराजांनी अनेक वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्रात अडकवून ठेवले होते.
संबंधित बातम्या