हिंदू धर्मात एकादशीला प्रचंड महत्व आहे. वर्षात विविध एकादशी साजऱ्या केल्या जातात. यामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. लवकरच देवशयनी एकादशी येत आहे. वैदिक शास्त्रानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो.
ज्योतिष अभ्यासानुसार चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यामध्ये मुंडन, साखरपुडा, विवाह, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये पूर्णपणे निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. तर देवशयनी एकादशी म्हणजे ती एकादशी ज्या एकादशीला देव निद्रा घेतात. याकाळात तब्बल चार महिने देव निद्रेत असतात. देवशयनी एकादशी कधी आहे ? आणि चातुर्मास कधी सुरु होणार? हे जाणून घेऊया.
हिंदू पंचागानुसार, देवशयनी एकादशीसाठी महत्त्वाची आषाढ शुक्ल एकादशी तिथी पुढच्या महिन्यात मंगळवार, १६ जुलै रोजी असणार आहे. यादिवशी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी ही तिथी आरंभ होईल. तर बुधवार, 17 जुलै रोजी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. त्यामुळेच उदयतिथीच्या आधारे यंदा देवशयनी एकादशी १७ जुलै रोजी असणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, देवशयनी एकादशी उपवासाच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी आहे. मात्र त्यानंतरही तुम्ही पूजा करू शकता. जे १७ जुलै रोजी देवशयनी एकादशीचा उपवास ठेवतील, ते १८ जुलै रोजी पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत कधीही सोडू शकतात.
आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत चालतो. म्हणजेच कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास समाप्त होतो. त्यादिवशी देवउठनी एकादशी असते. देवउठनी एकादशीला देव निद्रेतून जागृत होतात. हिंदू पंचांगानुसार चातुर्मासात आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक हे महिने येतात. परंतु तिथींवरुन पाहिल्यास हे ४ महिने होतात. हे चार महिने भगवान विष्णू निद्रेत असल्याने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
संबंधित बातम्या