अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून (१० मे) चारधामची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी लाखो भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ५५ लाखांहून अधिक भाविक चारधामच्या दर्शनासाठी पोहोचले होते, त्यामुळे उत्तराखंड राज्य प्रशासनाला अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला होता.
सर्व व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी यंदा दररोज दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, एका दिवसात किती लोक चारधामचे दर्शन घेऊ शकतील आणि चारधामचे सध्याच्या हवामानाची स्थिती काय आहे ते येथे जाणून घेऊया.
उत्तराखंड प्रशासनाने यंदा चारधामला जाणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ९ हजार भाविक यमुनोत्री धामचे दर्शन घेऊ शकतील.
तर दिवसभरात ११ हजार भाविक गंगोत्री धाममध्ये दर्शनासाठी जाऊ शकतील, तर दररोज १५ हजार भाविकांना बाबा केदारचे दर्शन घेता येणार आहे.
एका दिवसात १६ हजार भाविकांना यात्रेचा शेवटचा टप्पा असलेल्या बद्रीनाथ धामला जाण्याची परवानगी दिली जात आहे. म्हणजे एका दिवसात एकूण ५१ हजार भाविक चारधामचे दर्शन घेतील.
ही यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यासाठी प्रशासनाने ऋषिकेश आणि श्रीनगरमध्ये तयारी पूर्ण केली आहे. चारधाम यात्रा यमुनोत्रीपासून सुरू होते. पण काही भाविक फक्त केदारनाथ आणि ब्रद्रीनाथच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे चारही धामांना जाणाऱ्या यात्रेकरू आणि दोन धामांना जाणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
मे-जूनमध्ये उत्तराखंडमधील हवामान आल्हाददायक असते परंतु अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे भाविकांना त्रास देऊ शकतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यमुनोत्री आणि गंगोत्रीमध्ये १० आणि ११ मे रोजी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर रुद्रप्रयाग जिल्ह्यात मेघगर्जना आणि गारपिटीमुळे १० ते १३ मे दरम्यान केदारनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरूंना त्रास होऊ शकतो. येथेही जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बद्रीनाथचे हवामान १० ते १४ मे पर्यंत खराब राहू शकते.
बद्रीनाथ धाम हे चमोली जिल्ह्य़ात असून तेथेही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजे चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची हवामान परीक्षा घेऊ शकते.
असे मानले जाते की जर एखाद्याने आपल्या हयातीत चार धाम यात्रा केली तर तो त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो. चारधाम यात्रेला गेल्यावर भक्ताला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागत नाही आणि त्याला मुक्ती मिळते. यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदू धर्मात ही यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
संबंधित बातम्या