महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर! त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. रावजी आणि सौ . गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स.१९ फेब्रुवारी १८४५) या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला.
ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. व अखेर, वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन महाराजांनी एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले, आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरु केले, असे सांगितले जाते.
श्रीसमर्थांच्या परंपरेतील रामकृष्णांच्या सांगण्यानुसार नाथपंथीय गुरूपरंपरेतील येहळेगाव येथील तुकामाईंकडे गेले. तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम होता. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले. ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी (तेरा अक्षरांचा) मंत्र जपून रामोपासना करण्यास सांगितले आणि त्यांनी श्रीमहाराजांना रामदासी दीक्षा दिली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावले.
गोंदवलेकर महाराजांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन या माध्यमाने कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले. तसेच अनेक लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, सांसारिक काळजी ह्या पासून मुक्त केले.
सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता ‘जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.’ हे शेवटचे शब्द उच्चारून, या महापुरुषाने आपला देह ठेवला.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्त मेढ मार्गशीर्ष शुद्धप्रतिपदेला रोवली जाते. त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते. गोंदवलेकर महाराजाचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून- दशमीपर्यंत साजरा केला जातो.
दशमीचे दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा-सम्मार्जन करून रांगोळ्या घालतात. मंडपात मंडळी जमू लागतात. काकडआरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो. त्यात प्रथम सनईने सुरूवात होते. मग ५.३० वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम ॥’ हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते. अशा तऱ्हेने १०० हून अधिक वर्षे ही परंपरा अखंडित चालू आहे आणि सेवेकऱ्यांचा भाव व उत्साह तोच आहे.
संबंधित बातम्या