१९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले, त्यांपैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. महाराष्ट्रातील एक संत, सत्पुरुष अशी ख्याती असणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे.
वारकरी कुटुंबात रावजी आणि गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इसवीसन १९ फेब्रुवारी १८४५ ) या दिवशी श्री महाराजांचा जन्म झाला. पाळण्यात त्यांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले. गणपतीने गुरुजींकडून अल्पावधीतच विद्या आत्मसात केली. पण, अध्यात्माच्या ओढीने नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह बाल गणपती यांनी गुरू शोधण्यासाठी घर सोडले.
लहानपणापासूनच श्रीरामपरायण केल्यामुळे सद्गुरूची ओढ त्यांना लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडले. या प्रवासात ते अनेकांना भेटले, अनेक ठिकाणी फिरले. या काळात श्रीमहाराजांनी योगविद्या हस्तगत केली. मात्र, मनाचे समाधान होईना. श्रीसमर्थांच्या परंपरेतील रामकृष्णांच्या सांगण्यानुसार नाथपंथीय गुरूपरंपरेतील येहळेगाव येथील तुकामाईंकडे गेले. तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम होता. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले.
गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. आधुनिक सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्म आणि भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली.
ब्रह्मचैतन्य महारांची अनेक वचने, प्रवचने प्रसिद्ध आहेत. जपाने हे अनुसंधान साध्य होते. म्हणून भगवंताचे नाम हे साधन आहे. ते मीपणा नाहीसा करते, असे गोंदवलेकर महाराज सांगत. माणसाने आपल्या जीवनात परमेश्वराचे स्मरण करून प्रपंच आनंदमय परमार्थस्वरूप करावा, असे ते सांगत. परमात्मा सर्वव्यापी आहे. महाराज म्हणतात,
आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे।।
गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे।।
मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला. ब्रह्मचैतन्य महारांची अनेक वचने, प्रवचने प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या