Birsa Munda Jayanti 2024: थोर स्वातंत्र्यसेनानी, लोकनायक आणि आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे थोर क्रांतीकारी बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सुगना पुर्ती असे त्यांचे वडिलांचे नाव होते, तर करमी पुर्ती असे आईचे नाव होते. साल्गा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. तर पुढील शिक्षण त्यांनी एका मिशनरी शाळेत घेतले.
बिरसा मुंडा यांनी सन १८९९ साली ब्रिटिश सरकारविरोधात उलगुलान आंदोलन सुरू केले. हे सशस्त्र आंदोलन होते. आदिवासी समाजाच्या शोषणाविरुद्ध हे आंदोलन होते. बिरसा यांनी आदिवासी बांधवांना बिरसा राजचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच ब्रिटिश सरकारला भुईभाडे न देण्याचे देखील आवाहन केले.
या आंदोलनाअंतर्गत जमीदार, ख्रिश्चन मिशनरी आणि वसाहतवाद्यांच्या ठाण्यांवर पारंपरिक अशा धनुष्यबाणाद्वारे हल्ला चढवण्यात आला. ब्रिटिशांच्या शेतीपद्धतीपूर्वी आदिवासी खुंटकट्टी पद्धतीची शेती करत असत. परंपरागत आधिकाराच्या तत्त्वावर ही शेती आधारलेली होती. ब्रिटिशांनी ही पद्धत मोडीत काढली आणि आपली जमीनदारी पद्धत सुरू केली. यामुळे ब्रिटिशांचा ग्रामीण भागावर ताबा आला. यातून ते महसूल गोळा करत असत. या विरोधात बिरसा मुंडा यांनी संघर्ष केला. आंदोलन उभारले.
ब्रिटिशांनी हे आंदोलन मोडून काढले. ३ मार्च १९०० रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच म्हणजेच ९ जून १९०० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी आजारपणामुळे रांचीच्या तुरुंगात निधन झाले. मात्र त्यांचे कार्य अमर राहिले. त्यांनी उभारलेले आंदोलन त्यांच्या निधनानंतर संपुष्टात आले. आदिवासींना एकत्र करून आपल्या हक्कासाठी लढा देणारे ते पहिले नेते होते. त्यांमुळे त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण सालगा या गावात झाले. त्यांचे शिक्षक जयपाल नाग यांनी त्यांना पुढे जर्मन मिशन स्कूलमध्ये घातले. त्यानंतर बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे त्यांनी शाळा सोडली. ब्रिटिश सरकारचा प्रभाव आणि ख्रिश्चन मिशनरींचा वाढता हस्तक्षेप यामुळे आदिवासी समाजात असंतोष खदखदत होता. १८८६ ते १८९० या काळात ब्रिटिशांविरोधात झालेल्या सरदारी लराई या आंदोलनाकडून प्रेरणा घेतली.
आदिवासींचे शोषण अधिकच वाढल्याने बिरसा मुंडा यांनी लढ्याला सुरुवात केली. त्यांनी आदिवासींना ब्रिटिशांविरोधात लढण्यास एकत्र केले. या आंदोलनातून ते आदिवासी नेता म्हणून उदयाला आले. 'अबुआ राज सेतार जाना, महारानी राज तुंडू जाना' ही घोषणा त्यांनी दिली. या घोषणेचा अर्थ आपले राज्य पुन्हा येवो, महाराणीचे राज्य संपून जावो, असा आहे. आदिवासी संस्कृतीचा आधार घेत त्यांनी मूलनिवासी लोकांमधील चेतना जागवली. 'सिरमरे फिरन राजा जाई', अशी घोषणा त्यांनी दिली. या घोषणेचा अर्थ आदिवासींच्या राजाचा विजय असो, असा आहे. ही जमीन, हा प्रांत आपला आहे असे त्यांनी आदिवासींच्या मनावर बिंबवायसा सुरू केले. आदिवासी ख्रिश्चन धर्म स्वीकारत असताना त्यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्त्व सांगायला सुरुवात केली.
आदिवासी संस्कृतीचे महत्त्व सांगत असताना बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात असलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. आजारपण आणि देवाचा कोप, दैवाचा कोप या विषयांवर त्यांनी जनजागृती केली. त्यावेळी त्यांनी मोठी जनजागृती केली. यामुळे मुंडा आणि ओराव जमातीचे लेक बिरसाईत पंथात सामील झाले. त्यांनी धर्मांतराला विरोध करायला सुरुवात केली. बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांचे कार्य पाहून लोक त्यांना श्रद्धेने धरती बाबा म्हणजेच भगवान असे संबोधू लागले.
उलगुलान या शब्दाचा अर्थ प्रस्थापितांविरोधात बंज, एल्गार, महासंग्राम किंवा उठाव. तसेच या शब्दाचा अर्थ हल्लाबोल असाही केला जातो. हिंदी भाषेत या शब्दाचा अर्थ मोठा कोलाहल, उलथापालथ असाही सांगितला जातो.