भौम प्रदोष व्रत हा महादेवाची पूजा करण्यासाठी खास दिवस आहे. प्रदोष व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. असे मानले जाते की, हा महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे जेव्हा भगवान शिव आणि देवी पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा येतो. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. जेव्हा मंगळवारी हे व्रत असते तेव्हा त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हणतात. जून महिन्यातील पहिले प्रदोष व्रत मंगळवारी आहे. या शुभ दिवशी आपण भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची तयारी करत असताना, काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.
वैदिक पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी ४ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल. त्याच वेळी, ही तारीख ४ जून रोजी रात्री १० वाजून १ मिनिटांनी संपेल. उदया तिथी लक्षात घेऊन यावेळी प्रदोष व्रत ४ जून रोजी पाळण्यात येणार आहे. यासोबतच त्याची पूजा संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटे ते ९ वाजून १८ मिनिटे या वेळेत होईल.
असे मानले जाते की भौम प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची मनोभावे पूजा केल्यास ते चांगला आशीर्वाद देतात आणि ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी उत्सूक असतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद घेतल्यास सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, धन आणि आनंद लाभू शकतो. जे भाविक या दिवशी पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या वैवाहीक जीवनात आनंद राहतो आणि जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच लग्नाचे योग जुळून येतात.
या दिवशी भाविक लवकर उठून स्नान करतात आणि आनंदाने दिवसाची सुरुवात करतात. पूजेसाठी नैवेद्य म्हणून खीर तयार करतात. त्यानंतर चौरंगावर भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्ती किंवा प्रतीमा फोटो ठेवल्या जातात आणि त्यांना फुले अर्पण केली जातात. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी भाविक या दिवशी मंदिरात जातात. संध्याकाळी प्रदोष पूजा केली जाते आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीला मंत्रोच्चार केला जातो. आरती केल्यानंतर भाविक उपवास सोडतात आणि सात्त्विक अन्न ग्रहण करतात.