कृष्ण हा हिंदु धर्मातला एक लोकप्रिय देव. कृष्णाला विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. तो सोळा कलांनी युक्त असल्यामुळे पूर्णावतार मानला जातो. कृष्ण हा प्रेम आणि करुणेचा स्त्रोत मानला जातो आणि भक्तांचं संरक्षण करणारा देवता म्हणून पूजला जातो. महाभारत, भगवद गीता सारख्या अनेक ग्रंथांमध्ये कृष्ण हा मध्यवर्ती आहे. भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात चित्रकारांनी कृष्णाला विविध रुपात दर्शवलं आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे सध्या ‘भक्ती: द आर्ट ऑफ कृष्णा’ नावाचे चित्र प्रदर्शन सुरू आहे. कृष्णाचे जीवन आणि वारसा याद्वारे वैश्विक प्रेम आणि भक्तीचा शोध या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांमधून घेण्यात आला आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये भगवान कृष्णाच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण चितारलेले आहेत. काही चित्रांमध्ये बालपणीचा नटखट कृष्ण, गोपींचा प्रियकर कृष्ण, अर्जुनचा शिक्षक कृष्ण असे विविध रुप दर्शवले आहे.
कला आणि अध्यात्म याची सुयोग्य सांगड घालणाऱ्या या चित्र प्रदर्शनात क्वचितच पाहण्यात येणारे कृष्णाशी संबंधित एकूण १०७ चित्र, शिल्प आणि कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथील ‘आर्ट हाऊस’ या कला दालनाचे चारही मजले कृष्णाशी संबंधित चित्रांनी सजलेले आहेत. या भव्या चित्र प्रदर्शनात प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा, एम. एफ. हुसेन, मनजीत बावा, अमित अंबालाल, रकीब शॉ, ठुकराल आणि टागरा सारख्या नामवंत चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहे. पेंटिंग आणि ऑब्जेक्ट हायलाइट्समध्ये राजा रवी वर्मा याचे ‘द बर्थ ऑफ कृष्णा’ (१८९०) या चित्राचा समावेश आहे. गेल्या २५ वर्षात प्रथमच हे चित्र बडोद्याच्या महाराजा फतेह सिंग संग्रहालयाबाहेर प्रदर्शित करण्यात आले आहे. आधुनिकतावादी चित्रकार मनजीत बावा यांचे कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमाचे चित्रण करणारी चित्रे तसेच लंडनस्थित रकीब शॉ यांचे एक भव्य आणि तपशीलवार समकालीन या चित्र प्रदर्शनात मांडले आहे.
या प्रदर्शनाविषयी बोलताना इशा अंबानी म्हणाल्या, ‘आर्ट हाऊस या कलादालनाच्या चारही मजल्यांवर चैतन्य आणि भक्तीने ओतप्रोत अशा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भगवान कृष्णाच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण कॅप्चर करणे आणि त्यातून भव्य अशा तात्विक गोष्टींचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेम आणि प्रेमाच्या सर्व अभिव्यक्तींना एकत्र गुंफणाऱ्या या प्रदर्शनात आपल्या सर्वांचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय.'
चेन्नई येथील प्रसिद्ध क्युरेटर अश्विन ई. राजगोपालन यांनी या प्रदर्शनाची सुरेख अशी मांडणी केली आहे. हे प्रदर्शन १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत आर्ट हाउस, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू राहणार आहे.
संबंधित बातम्या