Bhagvan Buddha: तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांनी दिलेले उपदेश बुद्धवचन म्हणून त्रिपिटकात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. प्रज्ञा, शिल आणि समाधीच्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होते आणि यानेच दु:खावर मात करता येते असा उपदेश गौतम बुद्धांनी ४५ वर्षे लोकांना दिला. जगातील अज्ञानाचा अंधार दूर ज्ञानप्रकाश देणाऱ्या गौतम बुद्धांशी संबंधित अनेक प्रेरणादायी कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्यांपैकी अमृताची शेती या कथेचाही समावेश आहे. पाहू या काय आहे ही प्रेरणादायी कथा…
तथागत गौतम बुद्ध एकदा भिक्षाटन करताना एका कृषिवल भारद्वाज ब्राह्मणाच्या दाराजवळ आले. श्रमण गौतमाला आपल्या दारात येताना पाहून ब्राह्मण तिरस्काराने म्हणाला, ‘श्रमण, मी स्वत:ला नांगरतो आणि मग पोट भरतो. तसेच बिया नांगरून पेराव्यात, नंतर मेहनत करून अन्न खावे. ’
कृषिवल भारद्वाजाचे बोलणे ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले, "हे अन्नदाता, मीही शेती करतो. त्या शेतकऱ्याला बुद्धांच्या बोलण्याने कुतूहल वाटले आणि तो म्हणाला, "मला नांगर दिसत नाही, बैल दिसत नाही, शेतीसाठी जमीन दिसत नाही. मग तुम्हीही शेती करून अन्न खाता असे कसे म्हणता? तुमच्या शेतीबद्दल थोडं सांगा.
बुद्ध भारद्वाजास म्हणाले, " श्रद्धा हे माझे बीज, तपस्व ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभीरूता हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता नांगर फाळ आणि पराणी.'
बुद्ध पुढे म्हणाले, 'वचन आणि कर्म यांमध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतीम आनंदाचे पीक उगवेपर्यंत सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे. हा बैल खडबडीत जमिनीला कचरत नाही. तो सरळ शांतीच्या मार्गाने जेथे दु:खाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो."
तथागत गौतम बुद्धांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला की, "श्रमण गौतम, हीचा स्वीकार करावा. खरोखरच आपण कृषिवल आहात, आपण अमृताचे पीक काढता."
त्यावर तथागत बोलले, "पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्धपुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे. एखाद्या प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणास ती दे. त्याने तुला पुण्यलाभ होईल.'
बुद्धाच्या या वाणीने प्रभावित होऊन भारद्वाज ब्राह्मणाने प्रव्रज्जा आणि उपसंपदा घेतली आणि तो बुद्धांच्या संघात सामील झाला.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या