What is Rudraksha : प्राचीन काळापासूनच दैवी शक्तींमुळे रुद्राक्ष अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हणतात की, ज्यांच्यावर देवांचा अधिपती महादेवाचा आशीर्वाद असतो त्यांनाच रुद्राक्ष परिधान करण्याची संधी मिळते. 'रुद्राक्ष' म्हणजे - रुद्राचे अक्ष म्हणजेच भगवान शिवाचे अश्रू.
रुद्राक्षाला भगवाना शंकराचे वरदान मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया रुद्राक्षाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी.
रुद्राक्षाच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याच्याकडे दैवी शक्तीची विविध रूपे होती.यामुळे तो अत्यंत अहंकारी झाला आणि देव आणि ऋषींना त्रास देऊ लागला. त्याला कंटाळून देवांनी त्याला मारण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली.
देवांची पीडा-वेदना ऐकून भगवान शिव ध्यानात गेले. यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पृथ्वीवर जिथे जिथे त्यांचे अश्रू पडले तिथे तिथे रुद्राक्षाची झाडे उगवली. तसेच त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकराने संपूर्ण जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली.
रुद्राक्ष हे रुद्राक्षाच्या झाडावर उगवणारे नैसर्गिकरित्या मिळणारे सुके फळ आहे. जपमाळेत साधारणपणे १०८ रुद्राक्ष असतात. हे वेगवेगळ्या स्वरूपात आढळू शकतात, म्हणजे १ मुखी ते २७ मुखीपर्यंत. जे भक्त रुद्राक्ष धारण करतात त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतो.
धार्मिक मान्यतांनुसार रुद्राक्ष शुक्ल पक्षाच्या तिथीला धारण करावा, जसे की पौर्णिमा, अमावस्या, एकादशी इत्यादी. तसेच हा पवित्र धागा धारण करताना त्याची विशेष काळजी घ्यावी. भोलेनाथाचे ध्यान करताना आणि 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करत रुद्राक्ष धारण करावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)