उत्तर प्रदेशातील अयोध्येतल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. या शुभ कार्यासाठी २२ जानेवारी २०२४ ही तारीख आणि १२ वाजून २० मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. अभिजीत मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार आहे. या तारखेला आणि शुभ मुहूर्तावर रामाची प्राणप्रतीष्ठापना करण्यात येणार आहे. ही पूजा करण्यासाठी पूजाऱ्यांची निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण सुरू आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल ३ हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी २४ अर्जदारांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी २१ अर्जदारांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड करण्यात आलेल्या अर्जदाराचं प्रशिक्षण अजुनही सुरू आहे. सर्व अर्जदारांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर, परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वात योग्य व्यक्तींची श्रीरामाच्या सेवेसाठी नियुक्ती केली जाईल. सध्या २१ जण केवळ प्रशिक्षणासाठी आले आहेत. प्रशिक्षणादरम्यान, प्रत्येक उमेदवाराला दरमहा २००० रुपये दिले जाणार आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यासाठी देश- विदेशात आमंत्रणे पोहचली असून, मोठ मोठे लोकं या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
या पूजाऱ्यांमध्ये मोहित पांडेची निवड झाली असून, गाझियाबादचा रहिवासी असलेला मोहित पांडे हा दुधेश्वर वैदिक विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मोहित पांडेची अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. मोहित पांडे यांने सुरुवातीला सामवेदाचा अभ्यास केला आणि व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. मोहितने आचार्याची पदवी घेतल्यानंतर सध्या पीएचडीची तयारी करत आहेत. मोहितने दूधेश्वर वैदिक विद्यापीठात सात वर्षे धर्म आणि कर्मकांडाचा अभ्यास केला.
संबंधित बातम्या