Ayodhya ram mandir priests new uniform : देशातील कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेलं अयोध्येतील राम मंदिर जानेवारी महिन्यात उद्घाटन झाल्यापासून चर्चेत आहे. पहिल्याच पावसात मंदिराच्या गाभाऱ्याला गळती लागल्याचं वृत्त पसरलं होतं. त्यानंतर आता मंदिरातील पुजाऱ्यांच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांच्या गणवेशात बदल करण्यात आला आहे. तसंच, मंदिरात असताना पुजाऱ्यांना मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टनं हा निर्णय घेतला आहे.
राम मंदिरातील पुजारी याआधी भगवी पगडी, कुर्ता, धोतर असा भगवा पोशाख परिधान करत. मात्र, १ जुलैपासून पुजाऱ्यांनी पिवळे (पितांबर) धोतर, पिवळा कुर्ते आणि त्याच रंगाची पगडी असा पोशाख स्वीकारला आहे. अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी हा नवा ड्रेसकोड लागू केला आहे. पुजाऱ्यांना पिवळी पगडी बांधण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.
चौबंदी कुर्त्याला बटण नसतं. तो बांधण्यासाठी धागा वापरला जातो. पिवळ्या रंगाचं 'धोतर' हा सुती कापडाचा तुकडा कंबरेभोवती बांधून पाय गुडघ्यांपर्यंत झाकून ठेवतो, अशी माहितीही ट्रस्टच्या प्रतिनिधींनी दिली.
राम मंदिरात चार सहाय्यक पुजाऱ्यांसह एक मुख्य पुजारी आहे. आता प्रत्येक सहाय्यक पुजाऱ्यासोबत पाच प्रशिक्षणार्थी पुजारीही असतील. पुजाऱ्यांची प्रत्येक टीम पहाटे साडेतीन ते रात्री अकरा या वेळेत ५ तासांच्या शिफ्टमध्ये आपली सेवा देते.
हिंदू धर्मात भगवा, पिवळा, लाल आणि शुभ्र वस्त्राला विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या विधी व परंपरा पालन करताना हे रंग वापरले जातात. शुभ कार्यात अनेकदा पिवळ्या आणि भगव्या रंगांचा वापर केला जातो. मंदिराच्या पायाभरणी समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेचा न्यायालयीन वाद संपुष्टात आल्यानंतर तिथं भव्य राम मंदिर उभं राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वर्षीच्या जानेवारी महिन्यात मंदिराचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर सर्वसामान्य रामभक्तांसाठी हे मंदिर खुलं झालं आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशभरातील लोक मंदिराला भेट देत असतात. मंदिराच्या व्यवस्थेत वेळोवेळी आवश्यक ते बदल केले जात आहेत. पुजाऱ्यांचा ड्रेसकोड आणि इतर नियम हा देखील त्याचाच भाग आहे.
संबंधित बातम्या