Ayodhya Ram Mandir : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. येथील मंदिरात प्रतिष्ठापित केल्या जाणाऱ्या मूर्ती देखील तयार झाल्या आहेत. यातील श्रीरामाच्या मूर्तीसह इतर बहुतेक सर्व मूर्ती मुस्लिम मूर्तीकारांनी घडवल्या आहेत.
इंडिया टुडेनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, अयोध्येतील मंदिरात ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, त्या मूर्ती उत्तर बंगालमधील नॉर्थ २४ परगना येथील रहिवासी जमालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी बनवल्या आहेत. हे पिता-पुत्र मंदिराच्या आवारातील अनेक मूर्ती साकारत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, श्रीरामाची मूर्ती घडविण्याआधी देखील त्यांनी अनेक देवी-देवतांच्या मूर्ती तयार केल्या आहेत. ते शिल्पकार म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.
मूर्तीकार जमालुद्दीन याच्या मते, 'आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. धर्म ही खासगी बाब आहे. जातीय तणावाच्या घटना घडत असल्या तरी आपण सर्वांनी मिळून-मिसळून राहिलं पाहिजे. एका कलाकार म्हणून मी बंधुत्व आणि सौहार्दाची अपेक्षा करतो. अनेक वर्षांपासून मी हिंदू देवी-देवतांच्या फायबरच्या मूर्ती बनवतो, असंही त्यांनी सांगितलं. टिकाऊपणाच्या दृष्टीनं पाहिल्यास मातीच्या मूर्तींपेक्षा फायबरच्या मूर्तींना जास्त पसंती आहे. एखादी भव्यदिव्य मूर्ती तयार करण्यासाठी २.८ लाखांचा खर्च येतो, यातील सूक्ष्म कारागिरी यासाठी कारण ठरते, असंही तो म्हणाला.
अहवालानुसार, बिट्टूने सांगितले की, एक मूर्ती तयार करण्यासाठी किमान ३० ते ३५ कारागीर आणि दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यान सांगितलं की, उत्तर प्रदेशात या मूर्ती घेऊन जाण्यासाठी ४५ दिवस लागतात.
मंदिरात श्रीरामाची मूर्ती विराजमान होण्याआधीच अयोध्येत रेल्वे स्टेशन आणि विमानतळ तयार करण्याचे कामही सुरू आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाचं प्रवेशद्वार हे अयोध्येतील राम मंदिराचीच प्रतिकृती आहे. त्यामुळं स्थानकात येताच लोकांना श्रीराम मंदिराच्या दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे.
चालू वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटच्या दिवसापर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होऊन जाईल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या विमानतळाचे उद्घाटन करतील. इंडिगोचं पहिला विमान ३० डिसेंबरला अयोध्या येथील विमानतळावरून उड्डाण करेल. तर, कंपनीच्या व्यावसायिक सेवा ६ जानेवारीपासून सुरू होईल.
संबंधित बातम्या