पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.
यावेळी १७ सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला असून तो भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अमावस्येला म्हणजेच २ ऑक्टोबरला संपेल. पितृ पक्षाच्या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते.
पितृ पक्षातील प्रत्येक तिथीला महत्व आहे. पितृ पक्षात सर्व तिथींचे महत्त्व असले तरी यातील काही तिथी फार महत्त्वाच्या आहेत. या तिथींना पितरांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. यातच अविधवा नवमी श्राद्धाला अनन्यसाधारण महत्व आहे. यावेळी भाद्रपद महिन्यात नवमी श्राद्ध बुधवार, २५ सप्टेंबर रोजी केले जाईल. नवमी श्राद्धाला मातृ नवमी असेही म्हणतात.
ज्या स्त्रियांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या आधी झाला आहे त्यांचे श्राद्ध अविधवा नवमीला केले जातात. म्हणून अविधवा नवमी हा विधुरांचा दिवस आहे. मातृ नवमीच्या दिवशी ज्या मातांची मृत्यू तारीख माहित नाही त्यांचे श्राद्ध देखील केले जाते. नवमी तिथीला मृत्युतिथीशिवाय मातांचे श्राद्धही करता येते. मातृ नवमीच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुख, शांती, ऐश्वर्य आणि संपत्ती इत्यादींची प्राप्ती होते आणि सौभाग्य सदैव राहते, असे शास्त्रात सांगितले आहे.
या दिवशी घरातील मुलांनी व वधूंनी व्रत करावे कारण या श्राद्ध तिथीला सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात. स्त्री पितरांचे श्राद्ध विधी दुपारी १२ च्या सुमारास करावेत.
धार्मिक विधींसाठी तांब्याची भांडी वापरावीत. मृत महिलांच्या श्राद्धाच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा. या दिवशी सौभाग्याच्या वस्तूंचे दान केले पाहिजे.
पिठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. श्राद्ध करणाऱ्याने या दिवशी भागवत गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करावे.
जमल्यास पितृ पक्षातील मातृ नवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे आणि दान करावे.
या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान टाळा आणि ती सवय लावा, तर तुम्हाला अधिक शुभ परिणाम मिळतील.
या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं. यादिवशी शुभ कार्य टाळावी. तसेच, केस कापणं, नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं, असं सांगितलं जातं.
लसूण आणि कांदा जेवणात वापरू नये. श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत अन्न खाऊ नये, हे लक्षात ठेवा. या दिवशी कुठलेही अपशब्द वापरू नये.