विवाह ही आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाची बाब आहे. विवाहाच्या माध्यमातून दोन अनोळखी लोक एकत्र येऊन एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात. त्यामुळेच विवाहाचा दिवस प्रत्येकासाठी अतिशय खास असतो. हल्ली अनेकजण ट्रेंडनुसार कोणत्याही तारखेला लग्न करतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर विवाह केल्यास हा दिवस आयुष्यभर खास बनतो. शास्त्रानुसार, बऱ्याचवेळा मुहूर्त न पाहता लग्न केल्याने वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात प्रेम, सुखसमृद्धी टिकवण्यासाठी हा मुहूर्त अत्यंत महत्वाचा असतो.
प्रत्येक महिन्यात लग्नाचे कोणते ना कोणते शुभ मुहूर्त असतात. परंतु गेल्या २ महिन्यांपासून शुक्र अस्तामुळे फारच कमी किंवा विवाहाचे मुहूर्तच नव्हते. परंतु आता २ महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा लग्नसराई सुरू होणार आहे. मे-जून महिन्यात मुहूर्त नसल्याने अनेकांचे विवाह लांबणीवर पडले आहेत. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जुलैमध्ये पुन्हा लग्न सोहळे रंगणार आहेत. जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात लग्नासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर १७ जुलैपासून देवशयनी एकादशीपासून चतुर्मास सुरू होईल. म्हणजेच पुन्हा चार महिने लग्नाचे मुहूर्त नसतील. नोव्हेंबरमध्ये देऊठनी एकादशीपासून पुन्हा विवाहांना सुरुवात होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे अनेक शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. लग्नसाठी मुहूर्त शोधतानासुद्धा कुंडलीतील ग्रहांची दशा आणि दिशा तपासून घेतली जाते. मे आणि जून महिन्यात गुरु-शुक्र अस्तास गेले होते.गुरु आणि शुक्राच्या अस्तामुळे मे आणि जूनमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नव्हता. त्यामुळे याकाळात क्वचितच लग्नकार्य पार पडले. हिंदू धर्मातील अतिशय शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेलाही मर्यादित प्रमाणात विवाह संपन्न झाले. २८ एप्रिल रोजी अस्त झालेला शुक्र येत्या ५ जुलै रोजी उदय होईल, तर दुसरीकडे गुरु २ जून रोजी उदय झाला आहे. लग्नकार्यात या दोन ग्रहांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच यांच्या हालचाली खास ठरतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जुलै महिन्यात मात्र रखडलेले विवाहकार्य पार पडू शकतात. जुलैमध्ये लग्नासाठी एक-दोन नव्हे तर चक्क ५ शुभ मुहूर्त आहेत. येत्या ९ जुलैपासून विवाह सोहळे पुन्हा सुरु होतील. जुलै महिन्यात ९, ११, १२, १३ आणि १५ जुलै शुभ मुहूर्त असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनंतर मात्र १७ जुलै रोजी देवशयनी एकादशीपासून देव पुन्हा निद्रा घेतील आणि चातुर्मासला सुरुवात होईल. त्यामुळे विवाहासारखे शुभ कार्यही थांबतील. १७ जुलैनंतर पुन्हा ४ महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत कोणताही शुभ मुहूर्त निर्माण होत नाही.
नोव्हेंबरमध्ये देवउठनी एकादशीला देव पुन्हा उदय होतील. त्यामुळे विवाहासाठी शुभ मुहूर्त सुरु होईल. त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये १२, १३, १६, १७, १८, २२, २३ आणि २५ तारखेला शुभ मुहूर्त आहेत. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येही विवाह होऊ शकतात. त्यानंतर लग्नासाठी ६ शुभ मुहूर्त आहेत.