Ashadhi Ekadashi : वारी चुकायाची नाही…आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, शुभ योग आणि पूजा विधी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ashadhi Ekadashi : वारी चुकायाची नाही…आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, शुभ योग आणि पूजा विधी

Ashadhi Ekadashi : वारी चुकायाची नाही…आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, शुभ योग आणि पूजा विधी

Jul 15, 2024 08:50 PM IST

Ashadhi ekadashi 2024 Date : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू ४ महिन्यासाठी योग निद्रेत जातात. या काळात सर्व शुभ कार्ये थांबतात. जाणून घ्या या एकादशीचे महत्व, मुहूर्त, पूजाविधी आणि शुभ योग.

आषाढी एकादशी कधी आहे? देवशयनी एकादशी
आषाढी एकादशी कधी आहे? देवशयनी एकादशी

Devshayani Ekadashi 2024 Date, Muhurta, Shubh Yog, Puja Vidhi : वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीला खास महत्व आहे. यावर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी ४ शुभ योग तयार होत आहेत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्ये थांबतात. भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते. 

महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्व आणखी वाढून जाते. या एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो. देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्याच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे. देवशयनी एकादशीची तारीख, मुहूर्त, उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया-

आषाढी एकादशी कधी असते?

आषाढ शुक्ल एकादशी १६ जुलै रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होते आणि ती १७ जुलै रोजी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार देवशयनी एकादशीचे व्रत बुधवार, १७ जुलै रोजी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे ४ महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही. या काळात विवाह, मुंडन, गृहप्रवेश इत्यादी सर्व शुभ कार्ये थांबतील.

उपवास कधी सोडणार?

गुरुवार १८ जुलै रोजी उपवास सोडावा.

देवशयनी एकादशीला शुभ संयोग

बुधवार १७ जुलैला देवशयनी एकादशीला ब्रह्म मुहूर्तापासून पूजा करता येईल. त्यादिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला असून, त्यात केलेले कार्य यशस्वी होतील. देवशयनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होतात. हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रही आहे.

आषाढी एकादशी पूजा विधी

स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी, गणेशाला नमस्कार करा. पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा. आता पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करा. देवघरात तुपाचा दिवा लावावा, श्री विष्णु चालिसाचे पठण करावे, भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने आरती करा. दान-धर्म आणि अन्नदान करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.

या एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आहे. सर्व मंदिरात तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात खास आकर्षक सजावट केली जाईल. मोठ्या भक्ती भावाने पूजापाठ केले जाईल. ब्रम्ह मुहूर्तापासूनच भाविक भक्तीत लीन होऊन जातील.

Whats_app_banner