भारतीय पंचागांनुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरु होतो. या महिन्याला पावसाची देखील खास साथ असते. यंदा आषाढ महिना शनिवार, ६ जुलै २०२४ ला सुरु होणार असून तो रविवार, ४ ऑगस्ट रोजी संपत आहे.
आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला ‘आषाढ’ असे नाव पडले असे सांगितले जाते. या महिन्याला शूचि असे देखील म्हटले जाते. ऋतूमानानुसार प्रत्येक महिन्यात सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक पद्धती सांगितल्या जातात. प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे, तसेच आषाढ महिन्याला देखील आहे.
आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो. कारण या काळात अनेक मराठी सण येतात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो. मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते. त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्वाचा सण आणि उपवास हा याकाळात असतो.
आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथायात्रा निघते. मोठी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीही याच महिन्यात असते. त्यामुळे आषाढी वारीमुळं हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्वाचा ठरतो. त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात, अशी श्रद्धा आहे. आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली जाते. तसेच, भगवान विष्णूची वामन रूपात पूजा केली जाते.
आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो. भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरव केला जातो. पौराणिक दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले.
शनिवार ६ जुलै कालिदास दिन, श्री. टेंबेस्वामी पुण्यतिथी
रविवार ७ जुलै रथयात्रा
मंगळवार ९ जुलै विनायक चतुर्थी
गुरुवार ११ जुलै कुमारषष्ठी
बुधवार १७ जुलै देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्यारंभ
गुरुवार १७ जुलै वामन पूजन
रविवार २१ जूलै गुरुपौर्णिमा
बुधवार २४ जुलै संकष्ट चतुर्थी
बुधवार ३१ जुलै कामिका एकादशी
शनिवार ३ ऑगस्ट संत सावता माळी पुण्यतिथी
रविवार ४ ऑगस्ट आषाढ दर्श अमावस्या, दीपपूजा
या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात.
आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशयनी एकादशीनंतर शुभ कार्य करू नयेत. या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये, तसंच जास्तीत जास्त मसालेदार अन्नही खाऊ नये. या महिन्यात ब्रम्हचर्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं.
आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं. या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी, यामुळे सूर्य प्रसन्न होतो. या महिन्यात छत्री, मीठ आणि आवळ्याचं दान करणं फलदायी ठरतं. आषाढात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते, धनलाभ होतो असे सांगण्यात येते.
संबंधित बातम्या