जेष्ठ शुद्ध षष्ठीला अरण्यषष्ठी असे म्हणतात. वर्ष २०२४ मध्ये बुधवार १२ जून रोजी अरण्यषष्ठी सण साजरा केला जाईल. त्या दिवशी विंध्यवासिनीची षोडशोपचारे पूजा केली जाते . ही विंध्यवासिनी माता म्हणजे उमा,पार्वती,चंडी, काली यांचेच रूप आहे. ती आदिमाता आहे. तिला दुर्गा म्हणून ओळखले जाते. दुर्गेचे गुणवर्णन करणारा सातशे श्लोकांचा जो ग्रंथ आहे त्याला दुर्गासप्तशती असे म्हणतात. या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठही केला जातो.
महाभारतात एक कथा सांगितली जाते. वसुदेव देवकीच्या आठव्या पुत्राला मारण्यासाठी कंस कारागृहात येतो त्यावेळी वसुदेवाने आधीच कृष्णाला यमुनेपार नेऊन नंदबाबाच्या हवाली केलेले असल्यामुळे देवकीच्या कुशीत मुलगी बाळ असते. ती मुलगी असूनसुद्धा ती केवळ आठवी आहे म्हणून कंस तिला भिंतीवर आपटून मारण्यासाठी उचलतो आणि तो तसे करण्याआधीच ती त्याच्या हातातून निसटून आकाशात जाते. हे जे आदिमायेचे रूप आहे ती म्हणजेच विंध्यवासिनी दुर्गा माता. कंसाच्या हातून निसटून गेल्यावर दुर्गामातेने गंगेच्या तिरावर असलेल्या विंध्य पर्वतातील दाट आरण्याच्या ठिकाणी आपले वसतिस्थान केले म्हणून या तिथीला अरण्यषष्ठी असे म्हणत असावेत.
उत्तर प्रदेशात मिर्झापुर जिल्ह्यात विंध्य पर्वतावर दुर्गा मातेचे मंदिर आहे. या दिवशी तेथे तिची विशेष रूपाने पूजा अर्चा केली जाते. महाराष्ट्रात चिपळूण जवळ सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये विंध्यवासिनीचे मंदिर आहे.
प्रचलित मान्यतेनुसार, जे लोक अरण्य षष्ठीच्या व्रताचे पालन करतात त्यांना संतती प्राप्त होते. वास्तविक, जून महिन्यात पावसाळा ऋतूची सुरवात होते आणि ठिकठिकाणी झाडेझुडपे वाढून अरण्य निर्माण होऊन जाते. अरण्य षष्ठी हा निसर्गाचा सण आहे. अरण्यषष्ठी साजरी करताना, स्त्रिया उपवास करतात आणि जंगलात किंवा कदंब वृक्षाखाली पूजा करतात. या दिवशी षष्ठी तिथीला विंध्यवासिनी देवीची पूजा केली जाते आणि नैवेद्य दिला जातो. महिला सहसा दिवसभर फक्त फळे खातात. काही भागात स्त्रिया या विधीचा भाग म्हणून मनगटावर धागा बांधतात.
या दिवशी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांमध्ये ऋग्वेदातील अरण्य सुक्तमचे पठण समाविष्ट आहे. भारताच्या काही पश्चिम भागात षष्ठी देवीसोबत मांजरीची पूजा केली जाते. या दिवसाशी संबंधित सर्व पूजा आणि विधी प्रजनन विधींशी संबंधित आहेत ज्याचा उद्देश संतती प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे.