हिंदू पंचांगानुसार आज अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील चतुर्थी तिथी आहे. शास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थी तिथीलाच अंगारकी संकष्टी म्हणून संबोधण्यात येते. ही संकष्टी अतिशय खास मानली जात आहे. कारण आज असणारी संकष्टी २०२४ मधील एकमेव अंगारकी चतुर्थी असणार आहे. आज रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत अंगारकी चतुर्थीची वेळ असणार आहे. अनेक लोक आज श्रीगणेशाच्या दर्शनासाठी विविध मंदिरांना भेटी देतात. देशभरात गणरायाची अनेक अद्भुत मंदिरे आहेत. बाप्पाच्या सर्वच मंदिरांना चमत्कारिक मानले जाते. याठिकाणी जाऊन दर्शन घेतल्याने आणि आपल्या इच्छा प्रकट केल्याने गणपती बाप्पा भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. आज आपण अशाच एका चमत्कारिक मंदिराबाबत जाणून घेणार आहोत.
श्रीगणेशाला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणतेही नवीन कार्य करताना प्रथम पूजनीय देव श्रीगणेशाच्या नावाने सुरु करतो. देशभरात गणरायाची अनेक अद्भुत मंदिरे आहेत. मात्र जयपूरमधील एक मंदिर फारच खास आणि अनोखे आहे. याठिकाणी एकमेव असे मंदिर आहे जिथे श्रीगणेशाची विना सोंडेची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराची प्रचंड ख्याती आहे. या मंदिराला 'गड गणेश' मंदिर या नावाने ओळखले जाते.
जयपूरमधील अरवली पर्वतांवर स्थापित या मंदिराला फक्त अध्यात्मिकच नव्हे तर प्रचंड मोठे ऐतिहासिक महत्वदेखील आहे. १८ व्या शतकात राजा सवाई जयसिंग यांनी जयपूर शहराचा पाया रचण्यापूर्वी, त्याठिकाणी अश्वमेध यज्ञ केला होता. तसेच 'गड गणेश' मंदिराची स्थापना केली होती. आणि त्यांनंतर जयपूर शहराचा पाया घालण्यात आला होता. या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती उत्तर दिशेला स्थापित करण्यात आली आहे. जेणेकरुन श्रीगणेशाची कृपादृष्टी आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच जयपूर शहरावर राहील.
जयपूरमधील हे मंदिर अरवली पर्वत रांगामध्ये स्थित आहे. तब्बल ५०० फूट उंचीवर हे मंदिर आहे. श्रीगणेशाच्या या प्रसिद्ध मंदिरात जाण्यासाठी भक्तांना ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात. श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येथे दररोजच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी आहे. याठिकाणी तुम्ही फक्त मनोभावाने गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. म्हणूनच ३०० वर्षांपासून या मंदिरात स्थित बाप्पाचा एकही फोटो समोर आलेला नाही.
श्रीगणेशावर सर्वच लोकांची विशेष श्रद्धा असते. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातील लोक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा एका पत्रामध्ये लिहून श्रीगणेशाच्या चरणात अर्पण करण्यात येतात. आणि त्यांनतर सात बुधवार याठिकाणी येऊन बाप्पाला साकडं घालण्यात येतं. अशाप्रकारे गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या प्रवेश द्वारात दोन मूषकसुद्धा आहेत. त्यांच्या कानात आपल्या इच्छा व्यक्त केल्याने ते गणपती बाप्पापर्यंत पोहोचवतात अशी मान्यता आहे.
संबंधित बातम्या