कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची जत्रा म्हणजे मोठ्या उत्साहाचा कार्यक्रम आहे.देवीचा कौल घेऊन या जत्रेची तारीख काढण्याची पूर्वापार पद्धत आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव शनिवार २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या, या देवीच्या जत्रेत भाविकांची खूप गर्दी बघायला मिळते.
दरवर्षी लाखो भाविक मोठ्या उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी येतात. यात सामान्य नागरिकांपासून अनेक प्रथितयश कलाकार आणि राजकारणी मंडळी हमखास भेट देतात. अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात.
मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं आहे. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे आणि भराड म्हणजे माळरान म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक 'आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर' म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.
आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात असे सांगितले जाते. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या