Anganewadi Jatra 2024: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही जत्रा २२ फेब्रुवारी या दिवशी असेल असे आंगणे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे. प्रथेप्रमाणे धार्मिक विधी आणि देवीचा कौल घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. ही जत्रा दीड दिवस चालते. या जत्रेला दरवर्षी सुमारे ५ ते ७ लाख भाविक येत असतात. देवीने कौल दिल्यानंतर आता १४ डिसेंबरपर्यंत धार्मिक विधीसाठी श्री भराडीदेवीचे मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे.
मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतील श्री भराडीदेवीच्या यात्रेला विशेषत: मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. सर्वसामान्य लोकांसह विविध पक्षांचे राजकीय नेते देखील या जत्रेत सहभागी होत असतात.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असणाऱ्या मसुरे या गावात आंगणेवाडी नावाची वाडी आहे. या वाडीत भराडीदेवी विराजमान आहे. ही देवी भरडावर विराजमान झाली असल्याने या देवीचे नामकरण भराडीदेवी असे झाले आहे. भराड या शब्दाचा अर्थ माळरान असा होतो. या देवीच्या आजूबाजूचा परिसर माळरानाचा असल्यानेच या देवीला भराडीदेवी असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते.
खरं म्हणजे आंगणेवाडीतील हे भराडीदेवीचं मंदिर आंगणे कुटुंबीयांचे खासगी मंदिर आहे. तसा फलकही या कुटुंबीयांनी लावला आहे. ही देवी नवसाला पावते अशी या देवीची ख्याती आहे. त्यामुळे हे मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आलेले आहे.
दरवर्षी सुमारे ५ ते ७ लाख भाविक भराडीदेवीचे दर्शन घेत असतात. ही जत्रा केवळ दीड दिवसांची असते. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा नैवेद्य विशेष असा असतो. कारण हा नैवेद्य आंगणे कुटुंबीयांच्या माहेरवाशीणी अबोल राहून ते तयार करतात. या नैवेद्याचा लाभ प्रत्येक भाविकाला मिळतो हे विशेष.
आंगणेवाडीची जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. त्यासाठी देवीचा कौल घेतला जातो. याला देवीचा हुकूम असे म्हणतात. दरम्यान, या वर्षी सुमारे १० लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी जत्रेला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या