कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. यासोबतच श्रीगणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतो.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि १० दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. यंदा अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर, मंगळवारी येत आहे.
अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असतो. पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केले जाते. सुख-समृद्धीसाठी, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. तर गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होते. चला जाणून घेऊया गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते किंवा गणेश मूर्ती पाण्यातच का विसर्जित करतात? वाचा यासंबंधी कथा.
गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.
पौराणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते. महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली. महर्षी वेद व्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे सांगितले होते.
महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते. हीच धुळ व माती दहा दिवसानंतर स्वच्छ करण्यासाठी त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वंदता आहे. तसेच, वेद व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की गणेशाचे शरीर अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे उष्ण झाले आहे. त्यामुळे त्यांना पाण्यात डुबकी मारल्याविना पर्याय नव्हता अशीही अख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात.