अनंत चतुर्दशी या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. यावेळी मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवसाला अनंत चौदस असेही म्हणतात.
लोक या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देतात. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. म्हणूनच लोक या दिवशी विशेष पूजा करतात. या दिवशी अनंत धागा का बांधतात त्याचे काय फायदे आहे ते जाणून घेऊया.
विष्णु सहस्त्र नामावली वाचून १००१ तुळशी पत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.
अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते. अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात.
मध्यान्हकाळी स्नान करून, शुद्ध पाण्याने भरलेला कलश चौरंगावर मांडून त्यास दोन पंचे किंवा दोन छोटे रूमाल अथवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. या पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते.
यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्यशाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. तर अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. तांबडा रेशमाचा दोरा समंत्रक १४ गाठी मारुन अनंताचा दोरक म्हणून पूजेत ठेवला जातो. या दोऱ्यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत दोरा घरातील पुरुषाने उजव्या हातात तर अनंती ही त्याच्या पत्नीने डाव्या हातात बांधावी.