Amla Navami 2023: यंदा आवळा नवमी कधी? कथा, महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून
मराठी बातम्या  /  धर्म  /  Amla Navami 2023: यंदा आवळा नवमी कधी? कथा, महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून

Amla Navami 2023: यंदा आवळा नवमी कधी? कथा, महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून

Updated Nov 20, 2023 05:31 PM IST

Akshay Navami And Amla Navami 2023: यंदा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी आवळा नवमीचा सण साजरा केला जाणार आहे.

Amla Navami 2023
Amla Navami 2023

Amla Navami Story In Marathi: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुक्ल नवमीपासून द्वापर युगाला सुरुवात झाली. याच दिवशी श्री विष्णूने कुष्मांडका या राक्षसाचा वध केला होता. यामुळे या नवमीला कुष्मांडक नवमी असेही म्हटले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून कुटुंबाला आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली जाते. याशिवाय, तपश्चर्या, जप, दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात. या दिवशी या झाडाखाली बसून खा ल्ल्याने सर्व रोग दूर होतात. दरम्यान, आवळा नवमीची कथा, महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.

 

पूजाविधी

सूर्योदयापूर्वी आंघोळ करून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आवळ्याच्या मुळास दूध अर्पण करावे आणि कुंकू, तांदुळ, फुले, गंध इत्यादींनी झाडाची पूजा करावी. त्यानंतर झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून दिवा लावावा.

 

महत्त्व

पद्म पुराणानुसार आवळ्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आवळा खाल्ल्याने मनुष्यांचे सर्व पाप मुक्त होतात आणि आयुर्मान वाढते. याशिवाय, आवळ्याचा रस प्यायल्याने धर्मसंचय होण्यास मदत होते आणि आवळ्याच्या पाण्यात अंघोळ केल्याने दारिद्र्य दूर होतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार केल्याने भगवान विष्णू पावतात. जिथे आवळ्याचे झाड असते, तिथे भगवान विष्णू सदैव वास करतात, असे मानले जाते.

 

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीला भेट देण्यासाठी आली. वाटेत त्यांनी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा झाली. विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा कशी करता येईल? यावर देवी लक्ष्मीने विचार केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, तुळशी आणि बेलाचे गुणधर्म आवळ्यामध्ये एकत्र आढळतात. भगवान विष्णुला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तर, भगवान शिवला बेलाची पाने आवडतात. यानंतर देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली. देवी लक्ष्मीच्या पूजेने भगवान विष्णु आणि भगवान शिव प्रकट झाले. देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करुन विष्णू आणि भगवान शिवला दिले. यानंतर त्यांनी स्वतः जेवण केले. त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी होती. तेव्हापासून आवळा वृक्षाची पूजा करण्याची ही परंपरा सुरू झाली

मुहूर्त

यंदा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी आवळा नवमीचा सण साजरा केला जाणार आहे. सकाळी ०६.२७ ते ०७.३६ आणि अमृत कालात सकाळी १०.१२ ते ११.०० पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. अभिजित मुहूर्त हा सकाळी ११.३५ ते १२.१९ आणि दुपारी १२.३६ ते दुपारी ३.०० हा महेंद्र कालातील सर्वोत्तम मुहूर्त आहे.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक रुढी-परंपरांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner