Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेकरूंसाठी मोठी अपडेट, देवस्थानच्या निर्णयाने भाविकांना धक्का
मराठी बातम्या  /  धर्म  /  Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेकरूंसाठी मोठी अपडेट, देवस्थानच्या निर्णयाने भाविकांना धक्का

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेकरूंसाठी मोठी अपडेट, देवस्थानच्या निर्णयाने भाविकांना धक्का

Aug 23, 2023 10:01 AM IST

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळं देवस्थानने मोठा निर्णय घेत अनेकांना धक्का दिला आहे.

Amarnath Yatra 2023 Live Updates
Amarnath Yatra 2023 Live Updates (HT_PRINT)

Amarnath Yatra 2023 Live Updates : जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. भाविकांचा ओघ कमी झाल्याने अमरनाथ बोर्डाने एका आठवड्यासाठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अमरनाथ येथील रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली असून पवित्र गुहेपर्यंत पोहचण्याचे मार्गांचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आजपासून अमरनाथ यात्रा बंद करण्यात आली असून येत्या ३० ऑगस्ट पर्यंत यात्रा बंद राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात अमरनाथ यात्रेला जाण्याची तयारी करत असलेल्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या झपाट्याने कमी झाल्यांच दिसून येत आहे. त्यामुळं अमरनाथ देवस्थान बोर्डाने ३० ऑगस्ट पर्यंत अमरनाथ यात्रा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता यात्रेतील असुरक्षित मार्गांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. दऱ्याखोऱ्यातील मार्गांवर कठडे लावण्यात येणार असून मार्गांची डागडुजी करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला होणाऱ्या एका विशेष पारंपारिक यात्रेला अमरनाथ मंदिरात जाण्यासाठी देवस्थानकडून तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. पवित्र गुहेकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती सुरू असल्याने तिथं जाण्यास बंदी घालण्यात आल्याचं देवस्थानच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून सुरू झालेल्या यात्रेचा कालावधी दोन महिन्यांचा होता.

अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी काश्मिरमधील अनंतनाग, गंदेरबल, पहलगाम आणि बालटाल जिल्ह्यातील मार्गांवर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. याशिवाय मार्गांवर निमलष्करी दल आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामं सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटी रुपायांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील अमरनाथ देवस्थानच्या विकासासाठी सरकारकडून योजना आखण्यात येत आहे.

Whats_app_banner