आलू-वांग्याची भाजी, रोडग्याचा प्रसाद! राज्यातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात; काय आहे इतिहास?
मराठी बातम्या  /  धर्म  /  आलू-वांग्याची भाजी, रोडग्याचा प्रसाद! राज्यातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात; काय आहे इतिहास?

आलू-वांग्याची भाजी, रोडग्याचा प्रसाद! राज्यातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात; काय आहे इतिहास?

Jan 17, 2025 11:18 AM IST

Bahiram Baba Yatra : संपूर्ण राज्‍यात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्‍हणून ओळख असलेल्‍या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत आहेत.

आलू-वांग्याची भाजी, रोडग्याचा प्रसाद! राज्यातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात; काय आहे इतिहास ?
आलू-वांग्याची भाजी, रोडग्याचा प्रसाद! राज्यातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात; काय आहे इतिहास ?

Bahiram Baba Yatra : विदर्भातील महत्वाची व संपूर्ण राज्‍यात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्‍हणून ओळख असलेल्‍या बहिरम बाबाच्‍या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक मंदिराला भेट देत असून देवाला आलू-वांग्याची भाजी अन् रोडग्याचा नैवेद्य दाखवला जात आहे. शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बहिरम बाबा यांची विधिवत पूजा केली जात आहे.

बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. ४० दिवस चालणाऱ्या या यात्रेला लाखो भाविकांनी भेट दिली आहे. पौष महिन्याच्या दुसऱ्या रविवारी या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक आले होते. या मंदिरात भाविकांनी ५० हजारांहून अधिक नारळ फोडले. रविवारी ज्या भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या, त्यांनी बहिरम बाबांच्या चरणी चांदीचे झुले, डोळे, घोडे अर्पण केले तसेच रोडगे, आलू वांग्याच्या भाजीचा प्रसाद देखील अर्पण केला.

यात्रेदरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परतवाडा ते बैतुल हा रस्ता बंद करण्यात आला होता. तर येथील वाहतूक ही खारपी जुन्या चेकपोस्टजवळ करजगाव रस्त्याकडे वळवण्यात आली होती. परतवाडा ते बैतुल रस्ता दिवसभर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भाविकांना बोराळाहून कर्जगाव मार्गे बहिरमला जावे लागत आहे. भाविकांच्या संख्येमुळे येथील वाहनतळ आणि उभारण्यात आलेल्या सर्व राहुट्या (तंबू) हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे स्वतःच्या हातांनी रोडगे व मटण पार्ट्या आयोजित करणाऱ्या भाविकांना जागा शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. अनेकांना जागा न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या पार्ट्या रद्द केल्या.

मातीच्या भांड्यांना मागणी

बहिरमबाबा यात्रा ही एक प्राचीन यात्रा आहे. या यात्रेत पारंपारिक मातीची भांडी, घरगुती वस्तू इत्यादीना मागणी वाढली आहे. बहिरम यात्रेदरम्यान संक्रांतीच्या निमित्ताने वाणासाठी मातीच्या भांड्यांची मागणी वाढली. येथे आणलेले मातीचे भांडे आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. संक्रांतीच्या दिवशी महिला मातीचे भांडे वान म्हणून भेट देतात.

देवाला अभिषेक

सर्वप्रथम बहिरमबुवाच्या मूर्तीला शेंदूर, दूध-दही, मध व लोण्याचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पूजा करण्यात आली. यावेळी अज्ञात पूर्णाहुती देण्यात आली. होमहवन व आरती करून रोडग्याचा नैवेद्य बहिरमबुवाला दाखवण्यात आला. त्यानंतर शंखनाद करून यात्रेचे नारळ फोडण्यात आले. महापूजेला शिव मंदिर, हनुमान मंदिर, महागणपती मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला.

ही यात्रा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. गूळ, रेवडी, लाह्या, फुटाणे व नारळ हा बहिरमबुवाचा आवडीचा प्रसाद. त्यासह लोणी व शेंदूर हा विशेष मान असतो. भाविक आलू-वांग्याची भाजी व रोड्ग्याचा नैवेद्य देवाला दाखवतात. गवळी बांधवांसह आदिवासींचेसुद्धा बहिरम हे श्रद्धास्थान आहे. आदिवासी बांधव बहिरमबुवाला गुळ-भाकरचा नैवेद्य चढवतात. बोकड अर्पण करून त्याचा बळी देण्याची प्रथा होती. संत गाडगेबाबा, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेल्‍या प्रबोधनानंतर ही प्रथा बंद करण्यात आली.

काय आहे बहिरमबाबाच्या यात्रेचा इतिहास

या यात्रेला मोठा इतिहास आहे. अमरावती जिल्ह्यातील कौडिंण्यपूरचा संदर्भ बहिरमशी जोडला जातो. भगवान श्रीकृष्ण व कौडिंण्यपूर राजा रुख्मी यांच्या दरम्यान युद्ध झाले होते. तेव्हा बलराम यांच्या सैन्यात गवळ्यांचा समावेश होता. ते सैनिक म्हणजेच गवळी वऱ्हाडात थांबले होते. हे गवळी बांधव बहिरम डोंगराच्या पायथ्याशी हेटी करून राहिले होते. या हेटीचे गवळ्यांच्या गावात रूपांतर झाले. या ठिकाणी बहिरमबुवाची म्हणजेच भैरवाची मूर्ती सापडल्याने फार पूर्वी काळापासून भैरवनाथाच्या मूर्तीसमोर सुपारी ठेवली जात होती. तेव्हा पासून ही यात्रा सुरू झाली आहे. बहिरम बाबाला गवळी लोक प्रसन्न करण्यासाठी घरचे लोणी व त्यासोबत शेंदूर सुपारी अर्पण करतात. ही परंपरा अनेक वर्षापासूनची आजही सुरू आहे. शंकर आणि पार्वती सोबत असणाऱ्या बहिरम नावाच्या एका भैरवाने या स्थानाचा उद्धार व्हावा, अशी कल्पना शंकराकडे व्यक्त केली. तेव्हा या स्थानावर तुझ्या रूपाने माझा वास राहील, असा शंकराने बैरमला आशीर्वाद दिल्याची आख्यायिका आहे.

आलू-वांग्याची भाजी अन् रोडग्याचा प्रसाद

या यात्रेचे आकर्षण म्हणजे या यात्रेत मिळणारा प्रसाद. या यात्रेत हंडीतील मटण व रोडगे आणि आलू वांग्याची भाजी प्रसिद्ध आहेत. खवय्यांसाठी ही यात्रा एक मेजवानी असते. या यात्रेत हंडीतील मटण, वांग्याची भाजी व रोडग्याचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. तर काही खवय्ये मित्रपरिवारासह राहुटीमध्ये सहभोजन करत असतात. या यात्रेत शनिवारी आणि रविवारी मोठी गर्दी असते.

Whats_app_banner