प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशीला अजा एकादशी म्हणतात. अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते. भगवान विष्णूंना एकादशीचा सण समर्पीत केला आहे . वर्षभरात २४ एकादशी येतात. यंदा श्रावण महिन्यात २९ ऑगस्टला अजा एकादशी साजरी होणार आहे. उदया तिथीमुळे २९ ऑगस्टला एकादशी साजरी होणार असून, त्याचे पारण दुसऱ्या दिवशी होणार आहे.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा. यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुले, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा यासोबतच अजा एकादशीची व्रत कथा ऐका किंवा वाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडता येतो. जर तुम्हीही व्रत पाळत असाल, तर तुम्ही उपवासाची ही कथा येथे वाचू शकता-
पुराणानुसार एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिर यांना सांगितले होते. या व्रताचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले आहे की, जो अजा एकादशीचा उपवास करतो तो अश्वमेध यज्ञ करण्याइतकेच पुण्य मिळवण्याचा पात्र आहे. मृत्यूनंतर त्याला विष्णुलोकात स्थान मिळते.
कथा अशी की, सत्ययुगात सूर्यवंशी चक्रवर्ती हरिश्चंद्र हे एक महान सत्य बोलणारे राजा होते आणि त्यांच्या सत्य बोलण्यासाठीच ते प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी आपला शब्द दिला आणि त्या शब्दासाठी त्यांनी आपले संपूर्ण राज्य राजऋषी विश्वामित्रांना दान केले. इतकेच नाही तर त्यांनी आपली पत्नी आणि मुलगाच नव्हे तर स्वतःलाही चांडालला गुलाम म्हणून विकले.
यामुळे त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले, पण ते सत्यापासून विचलित झाले नाही. मग एके दिवशी त्यांची भेट ऋषी गौतमांसोबत झाली, तेव्हा ऋषी गौतम यांना या समस्येवर उपाय विचारला, ऋषींनी त्यांना अजा एकादशीचा महिमा सांगितला आणि हे व्रत करण्यास सांगितले. राजा हरिश्चंद्राने आपल्या क्षमतेनुसार हे व्रत पाळले. त्यामुळे त्यांना त्यांचे हरवलेले राज्य तर परत मिळालेच पण कुटुंबासह सर्व प्रकारचे सुख उपभोगून ते शेवटी भगवंताच्या परमधामात पोहोचले.
अजा एकादशी व्रताच्या प्रभावामुळे त्यांची सर्व पापे नष्ट झाली. हरवलेले राज्य आणि कुटुंबही परत मिळाले. अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय शरीर, मन आणि विचारांमध्ये शुद्धता येते. जर तुम्ही काही विशेष मंत्रांचा एकत्रितपणे जप केला तर अजा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.