Maha Kumbh 2025: प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या महाकुंभाची सांगता २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जगभरात ज्याचे आकर्षण आहे असे या महामेळ्याला अंदाजे ४० कोटी लोक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोणत्याही प्रचंड गर्दीच्या ठिकाणी किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडण्याचे प्रकार घडताना दिसतात. मात्र या महामेळ्यात अशी वाईट घटना घडू नये यासाठी मेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे ही अतिशय महत्वाचे आहे. यासाठी कृत्रिम बुद्धितमचेचा (AI) वापर केला जात आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील स्क्रीनद्वारे पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
१३ जानेवारीपासून सुरू झालेल्या आणि सहा आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या हिंदू धार्मिकतेचा आणि धार्मिक स्नानाचा हजारो वर्षांचा पवित्र कार्यक्रम असलेल्या कुंभमेळ्याला ४० कोटी यात्रेकरू भेट देतील असा अंदाज आयोजकांचा आहे.
लोकसंख्येत अव्वस असणाऱ्या भारतासारख्या देशात धार्मिक उत्सवांमध्ये मोठी गर्दी होत असते. तसेच काही ठिकाणी चेंगराजेंगरीत जीवघेणे अपघात देखील होत असतात. कुंभमेळ्यासारख्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणीही या पूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. हे लक्षात घेता पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करत आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमाशी बोलताना कुंभमेळ्यातील तंत्रज्ञान ऑपरेशनचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की, आम्हाला प्रत्येकाने त्यांचे आध्यात्मिक कर्तव्य पार पाडल्यानंतर आनंदाने घरी परत जावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. जी संवेदनशील ठिकाणे आहेत, अशा ठिकाणांवर गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आम्हाला मदत करत आहे.
महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. कुंभमेला हा १२ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा महाकुंभ होत आहे. या महाकुंभात केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लोक, भाविक येत आहेत. या काळात कोट्यवधी भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी येतात. त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
संबंधित बातम्या