मंगळवार १३ ऑगस्ट रोजी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.वयाच्या ८ व्या वर्षीच अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती.
पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला. मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
अहिल्याबाईनी आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, विहिरी खोदल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केले. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली.
भारतात चारी दिशांनी असलेल्या धर्मसंस्थांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची उभारणी केली. देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न खूप मोठा होता.
अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
देशभरातील बारा ज्योतिर्लिंग व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांचे सर्वात नावाजलेले कार्य म्हणजे आज सुद्धा, आपण उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरम. प्रत्येक मंदिरात आज सुद्धा तुम्हाला मराठी पुजारी हमखास आढळतील. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय.
विशेष म्हणजे काशी विश्वनाथ व सोमनाथ या दोन्ही मंदिराच्या निर्माणावेळी तिथे मुस्लीम राज्य कर्त्यांचे शासन होते. पण अहिल्यादेवींच्या मुत्सद्देगिरीमुळे कधीच जिर्णोध्दाराला अडथळा आला नाही. टिपू सुलताननेही अहिल्यादेवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्ये करू दिली. एवढेच नव्हे, तर त्यांना “तत्त्वज्ञ महाराणी’ असेही संबोधले.
अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले होते.
आजही देशभरातील अनेक गावात, मंदिराच्या ठिकाणी अहिल्यादेवीनी केलेले कार्य मराठी माणसाची मान उंचावत उभे आहे.