Gavpalan : देवाने दिला कौल, आता गाव जाणार पळून! काय असते कोकणातील 'गावपळण' प्रथा? यंदा कधी होणार?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Gavpalan : देवाने दिला कौल, आता गाव जाणार पळून! काय असते कोकणातील 'गावपळण' प्रथा? यंदा कधी होणार?

Gavpalan : देवाने दिला कौल, आता गाव जाणार पळून! काय असते कोकणातील 'गावपळण' प्रथा? यंदा कधी होणार?

Dec 02, 2024 04:05 PM IST

What Is Gavpalan Tradition In Kokan : आचरा गावाचे रहिवासी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट बघत असतात. या गावपळणीसाठी ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो.

Achara Village Gavpalan : काय असते कोकणातील 'गावपळण' प्रथा?
Achara Village Gavpalan : काय असते कोकणातील 'गावपळण' प्रथा?

Gavpalan In Achara Village : महाराष्ट्रातील विशेषत: कोकणातील काही मोजक्या गावांमध्ये आजही ‘गावपळण’ ही परंपरा पाळली जाते. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही काही ठिकाणी आवर्जून जोपासली जाते. कोकणातील आचरा या गावात आजही ही प्रथा पाळली जाते. आचरा गावाचे रहिवासी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट बघत असतात. या गावपळणीसाठी ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो. यावेळी संपूर्ण गावाचं लक्ष या कौलाकडे लगलेलं असतं. देवाने होकारार्थी कौल देताच गावपळणीची तयारी सुरू होते आणि तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशी बाहेर पळून जातं. यंदाच्या वर्षी देवाने होकारार्थी कौल दिल्याने आचऱ्यात गावपळण होणार आहे.

कधी होणार यंदाची गावपळण?

'देव दिवाळी'निमित्ताने देव रामेश्वराच्या चरणी लागलेल्या कौलचे उत्तर यंदा होकारार्थी आले आहे. दर चार वर्षांनी होणारी ही गावपळण यंदा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.या दिवसापासून पुढच्या ३ दिवसांसाठी गाव पळून वेशीबाहेर जाणार आहे. अर्थात संपूर्ण गाव आचाऱ्याच्या वेशीबाहेर राहणार आहे.

Khandoba Navratri : आजपासून मार्तंडभैरव षडरात्रोत्सव प्रारंभ, जाणून घ्या पूजा विधी, महत्व आणि मान्यता

काय आहे 'गावपळणी'ची कथा?

शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूत-पिशाच्यांनी उच्छाद मांडला होता, ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या काळात, गावकऱ्यांनी श्री देव रामेश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणी साकडं घातलं. देव रामेश्वराने त्यांना तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गाव सोडण्याचा आदेश दिला. या कालावधीत, रामेश्वराच्या कृपेने संपूर्ण गाव भूत-पिशाच्यांपासून मुक्त झालं. आजही अशी श्रद्धा आहे की, गावपळणीच्या दरम्यान श्री रामेश्वर गावाचे शुद्धीकरण करतो आणि त्याच्या कृपेने गावात सुख-शांती आणि समृद्धी नांदते.

काय असते 'गावपळण' प्रथा?

गावपळणी'मध्ये तीन दिवसांसाठी गाव सोडावे लागते. यासाठी संपूर्ण घराची आवाराआवर स्वच्छता करावी लागते. तीन दिवसांनी परतल्यावर, सर्व काही नव्याने सुरू करावे लागते. पूर्वीच्या काळात 'वीकेंड पिकनिक' किंवा 'आऊटिंग' सारखे शब्द वापरले जात नसल्याने, दर तीन-चार वर्षांनी होणारी संपूर्ण गावाची सहल हाच त्या काळातील एक आनंदाचा आणि विश्रांतीचा अनुभव होता. या निमित्ताने गावातील प्रत्येक स्तरारातील मंडळी एकत्र येतात. अगदी आपल्या घरातील गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी आणि कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांचा संसार थाटला जातो. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्याने आणि परस्परांच्या मदतीने, सर्वांच्या इच्छा आणि सुविधा लक्षात घेऊन निवासाची तयारी केली जाते. हा अनुभव खूप खास असतो. रोजच्या कामकाजातून थांबा घेतल्यामुळे कुटुंबीयांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालता येतो. गावाची शाळा झाडाखाली एकत्र भरते. तर, निसर्गाच्या सानिध्यात अनेक कुटुंबांचा एकत्र स्वयंपाक तयार केला जातो. यानिमित्ताने सगळे एकत्र येतात.

Whats_app_banner