Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेश सरकारला मिळणार तब्बल २ लाख कोटी रुपयांचा महसूल
मराठी बातम्या  /  धर्म  /  Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेश सरकारला मिळणार तब्बल २ लाख कोटी रुपयांचा महसूल

Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेश सरकारला मिळणार तब्बल २ लाख कोटी रुपयांचा महसूल

Jan 14, 2025 05:32 PM IST

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेश सरकारला तब्बल २ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक भेट देण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुंभमेळ्यातून यूपी सरकारला मिळणार २ लाख कोटी रुपयांचा महसूल
कुंभमेळ्यातून यूपी सरकारला मिळणार २ लाख कोटी रुपयांचा महसूल

जगातला सर्वात मोठा मानवी मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४५ दिवसांच्या कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरूवात झाली. हा कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दर १२ वर्षांनी एकदा 'महाकुंभ' भरत असतो. कुंभमेळ्याचा समारोप होईपर्यंत सुमारे ४० कोटी भाविक कुंभमेळ्याला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराज येथील संगमावर चार हजार हेक्टर जागेवर कुंभमेळा आयोजित केला गेला आहे. आज, १४ जानेवारी रोजी या महाकुंभातील पहिले अमृतस्नान झाले. मकर संक्रांतीनिमित्त लाखो भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी दाखल झाले होते. प्रयागराज येथील महाकुंभ २०२५ मधून उत्तर प्रदेश सरकारला दोन लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल, असा अंदाज उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारला मिळणार दोन लाख कोटींचा महसूल

गेल्या अनेक कुंभमेळ्याप्रमाणे यंदाच्या ‘महाकुंभ २०२५’ मधून राज्य सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे. कुंभमेळ्यात अगदी दूध विक्रेत्यापासून हेलिकॉप्टर चालवणाऱ्या कंपनीपर्यंत विविध घटकांना कुंभमेळ्यातून उत्पन्न मिळते.

महाकुंभ २०२५ मध्ये भाविकांना लागणाऱ्या मूलभूत वस्तुंच्या विक्रीतून सुमारे १७,३१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) उत्तर प्रदेश शाखेने व्यक्त केला आहे. या मेळाव्यात किराणा माल विक्रीतून चार हजार कोटी रुपये, खाद्यतेलाच्या विक्रीतून एक हजार कोटी रुपये, भाजीपाल्याच्या विक्रीतून दोन हजार कोटी रुपये, खाटा, गाद्या, बेडशीट व इतर घरगुती वस्तूंच्या विक्रीतून पाचशे कोटी रुपये, दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून चार हजार कोटी, हॉस्पिटॅलिटीमधून २५०० कोटी रुपये, ट्रॅव्हलमधून ३०० कोटी रुपये, नाविकांना ५० कोटींचा महसूल मिळणार आहे.

एका अंदाजानुसार कुंभमेळ्याच्या धार्मिक प्रवासादरम्यान प्रति व्यक्तीद्वारे सरासरी ५,००० रुपयाचा खर्च अपेक्षित धरल्यास एकूण खर्च २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त होणार आहे. यामध्ये हॉटेल, गेस्टहाऊस, तात्पुरती निवासस्थाने, अन्न, धार्मिक वस्तू, आरोग्य सेवा आणि इतर सेवांवरील खर्चाचा समावेश आहे' असे कॅटचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय राजधानीतील चांदनी चौक मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

महाकुंभात ६ लाखांहून अधिक नोकऱ्या

२०१३ मध्ये झालेल्या महाकुंभ मेळाव्यातून सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) अभ्यासानुसार कुंभमेळ्यातून १.२ लाख कोटी रुपयांची कमाई झाली आहे. कुंभमेळ्याशी निगडित आर्थिक उपक्रमांमुळे २०१९ मध्ये विविध क्षेत्रांत ६ लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळाला. कॅटच्या म्हणण्यानुसार केवळ पूजेच्या वस्तूंच्या विक्रीतून २००० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर ४५ दिवस चालणाऱ्या या मेळ्यातील फुलांचा व्यापार अंदाजे ८००० कोटी रुपये असेल. प्रयागराज येथील महाकुंभ हा स्थानिक व्यवसायीकांसाठी सुवर्णसंधी असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष आलोक शुक्ला यांनी म्हटले आहे. 

प्रयागराज आणि आसपासच्या परिसरातील १५० हॉटेल्स भाविक आणि पर्यटकांसाठी लक्झरी सेवा देतात. या लक्झरी तंबूची किंमत एका रात्रीसाठी १८ ते २० हजार रुपये आहे. दोन पाहुण्यांसाठी एका रात्रीसाठी प्रिमियम निवासाची किंमत एक लाख रुपये आहे. स्नानाच्या दिवशी मागणी जास्त असल्याने संगम निवासमधील सर्व ४४ सुपर लक्झरी तंबू विकले गेल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे (यूपीएसटीडीसी) व्हिला, महाराजा, स्विस कॉटेज आणि वसतिगृह अशा चार प्रकारच्या तंबू असून, वसतिगृहांसाठी प्रतिरात्र १५०० रुपयांपासून ते महागड्या तंबूंसाठी ३५,००० रुपयांपर्यंत दर आहे.

'महाकुंभ २०२५'मधील सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे हेलिकॉप्टर सेवा. या सेवेतून दररोज सरासरी साडेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, प्रत्येक यात्रेकरूसाठी पाच हजार रुपये दराने ४५ दिवसांच्या कालावधीत सात हजार यात्रेकरूंना सेवा दिली जाणार आहे. रिपोर्टनुसार, हेलिकॉप्टर सेवेमुळे ४५ दिवसांत १५७ कोटी रुपयांहून अधिक कमाई होईल.

अर्थसंकल्पीय तरतूद

उत्तर प्रदेश सरकार या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अंदाजे ७५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभाच्या आयोजनासाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०२३-२४च्या अर्थसंकल्पात ही रक्कम २५०० कोटी रुपये आणि २०२२-२३च्या आर्थिक वर्षासाठी ६२१.५५ कोटी रुपये होती. महाकुंभासाठी केंद्राने २१०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे.

टेम्पो चालक, रिक्षाचालक, मंदिराच्या ठिकाणी फुलविक्रेते, वस्तू विकणारे, बोट चालक आणि अगदी हॉटेल अशा छोट्या विक्रेत्यांच्या कमाईमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. कुंभमेळ्या भोवतीच्या संपूर्ण परिसंस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे,' असे आनंद यांनी सांगितले.

Whats_app_banner