राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामतीमध्ये आज (बुधवार) बंद पुकारण्यात आला आहे. तर पुणे, सोलापूरसह राज्यातील विविध भागात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
ज्यांनी गुन्हा दाखल केला असेल त्यांचे धन्यवाद! : शरद पवार
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शरद पवार, त्यांचे पुतणे तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन्ही पवारांसह ७० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याआधारे सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) या सर्वांवर मंगळवारी मनी लाँडरिंग कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या आराेपींत राज्य सहकारी बँकेचे आजी- माजी संचालक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांसह व काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ईडीकडून अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल
मंगळवारी सांयकाळी ही बातमी समोर येताच पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत, तर बारामतीत बंद पाळण्याचा स्थानिकांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. हा नागरिकांचा उत्स्फूर्तपणे बंद असेल, असे बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी दहा वाजता निषेध आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.