पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका पुढे ढकलल्या

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका

महाराष्ट्र विधासभेच्या २०१९ च्या निवडणूकांबाबतची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी व नंतर पोलिस विभागावर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने फार मोठा ताण येऊ शकतो. त्यामूळे अशा परिस्थतीत राज्यातील अकृषी विद्यापीठामधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबर, २०१९ मध्ये घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस विभागावर फार मोठा ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी यासंदर्भात विचार करुन सदर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाला असावा, अशी दुरुस्ती महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये करण्यात आली आहे. परंतु या निवडणुका नक्कीच घेण्यात येतील, असा विश्वास उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.  

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तावडे यांनी सांगितले की, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या कुलगुरुंनी यापूर्वी घोषित केले आहे. हे वेळापत्रक घोषित केल्यानंतर स्थानिक जिल्हाधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी यांनी या निवडणूकांच्या नियोजनासंदर्भात काही शंका स्थानिक विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे उपस्थित केल्या. त्या शंका कुलगुरुंनी शासनाकडे पाठविल्या. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना येण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रशासन वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेले असते. या कारणास्तव यासंदर्भात आम्ही राज्याचे मुख्य निवडणूक प्रमुखांची भेट घेतली. तसेच गृहसचिवांचीही भेट घेतली. त्यांचे या संदर्भातील अभिप्राय घेतल्यानंतर असे लक्षात आले की, केवळ निवडणूक आचारसंहिता नव्हे तर दुष्काळ, महापूर, त्सुनामी आदी नैसर्गीक आपत्ती निर्माण झाली अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये नव्हती. 

त्यामुळे उपरोक्त परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा दोन्ही निवडणूकांचे वेळापत्रक एकाचवेळी आल्यास विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाला असावा, अशी कायद्यात तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, त्यानुसार या निवडणूका महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९९(११)(क) बदलाबाबतची अधिसूचना व आदेश निर्गमित करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती तावडे यांनी आज दिली.

महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये केलेली दुरुस्ती राज्यपालांकडे जाणार आहे. या कायद्याच्या दुरस्तीच्या तरतुदीवर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करताना  तावडे म्हणाले की, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, तरीही या निवडणुका नक्कीच घेण्यात येतील. या निवडणुकांच्या माध्यमातून चांगले नेते आणि चांगले मतदार निर्माण होतात, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे निवडणूका फक्त पुढे ढकलल्या जातील, पण रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.