नोटाबंदीच्या काळात कमावलेल्या पैशातूनच भाजप लोकप्रतिनिधींची खरेदी करत असून, गोवा आणि कर्नाटकातील राजीनामानाट्य हे त्याचेच उदाहरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी भाजपवर निशाणा साधला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
२०१९ च्या लोकसभेत पीयूष गोयल यांनी ३०३ जागांचा दावा केला होता. जो तंतोतंत खरा ठरला. जिथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे, अशा देशात त्यांनी इतक्या बारकाईने भविष्यवाणी केली. त्याबद्दल मी गोयल यांचे अभिनंदन करतो, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी योगासनाला मीडिया इव्हेंट बनवत आहेत, दिग्विजय सिंह यांचा टोला
ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते पदावर कायम राहावेत, अशी सर्वांचीच इच्छा आहे, परंतु ते तयार नाहीत. नेहरू, गांधी परिवारातील कोणीही पक्षाच्या अध्यक्षपदी नसावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
मग मला अटक करा
पुण्यात एल्गार परिषदेच्या तपासप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजयसिंह यांचा मोबाइल क्रमांक होता. याबाबत ते म्हणाले, माझा क्रमांक राज्यसभेच्या संकेतस्थळावर आहे. तो कुणाकडेही असू शकतो. मात्र, मी नक्षलवाद्यांना मिळालो आहे, असे पोलिसांना वाटत असेल तर ते मला अटक का करत नाहीत?, असा उलट सवाल त्यांनी केला.