पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आढळराव पाटील आंबेगावमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे शिरूरमधील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. पण आढळराव यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आंबेगावमधून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळावी, अशी समर्थकांची भावना आहे. याबद्दल आढळराव यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही.

'हिंदूस्थान टाइम्स'शी बोलताना ते म्हणाले, नुकतेच निकाल जाहीर झाले आहेत. मी भविष्यातील कोणतेही नियोजन अद्याप केलेले नाही. पण मी राजकारणात सक्रिय राहणार आहे. लोकांच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहिन.

शिरूरमधून अभिनेते अमोल कोल्हे विजयी, आढळराव पराभूत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव याच मतदारसंघातून विधानसभेवर गेले आहेत. त्यामुळे याच मतदारसंघातून आढळराव यांनी उमेदवारी मागितल्यास इथे कडवी लढत पाहायला मिळू शकते. या दोन्ही तुल्यबळ नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे. आढळराव यांना पाडण्यासाठी वळसे पाटील कायम प्रयत्नशील असतात. यावेळी आढळराव निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे एक प्रकारे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.  

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. मला याबद्दल काहीही माहिती नाही. तुम्ही आढळरावांनाच विचारा, असे त्यांनी सांगितले. आढळराव आणि वळसे पाटील हे दोघे एकेकाळी एकमेकांचे मित्र होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००४, २००९ आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर यश मिळवले.