पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?

पुण्यात ओढे, नाले पुराच्या पाण्यामुळे दुथडी वाहात होते.

पुण्यात बुधवारी रात्री खूप कमी वेळात अतिप्रचंड म्हणता येईल असा पाऊस पडला. यामुळे शहराच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यामुळे आणि इतर घटनांमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून १३ जणांचा बळी गेला. गुरुवारी सकाळपासून पुण्यातील पाऊस हा विषय राज्यात चर्चेत होता. बुधवारी रात्री पुण्यात नक्की घडले काय जाणून घेऊया...

१. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात रात्रीच्या वेळी पाऊस पडतो आहे. ढगांच्या कडकडाटासह मर्यादित वेळेत पाऊस पडतो. तसाच पाऊस बुधवारी संध्याकाळी साडेआठनंतर सुरू झाला. विशेष म्हणजे पुण्याच्या दक्षिण बाजूला म्हणजेच कात्रज, सिंहगड रस्ता, कोंढवा, सहकार नगर, पद्मावती या भागात पावसाचा जोर खूप जास्त होता. तुलनेत पुण्याच्या उत्तर भागात तितका मोठा पाऊस पडत नव्हता.

२. कात्रजच्या परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळे कात्रजपासून सुरू होणाऱ्या आंबिल ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आले. पुणे शहरातील पेठांपासून हा भाग उंचावर आहे. तिथे पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे ते पाणी आंबिल ओढ्यातून वाहत खालच्या बाजूला येऊ लागले.

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

३. आंबिल ओढ्यातील पावसाचे पाणी कात्रजच्या उतारावरून वेगाने खाली आले. उतारावरून खालच्या बाजूला आल्यावर पद्मावती, सहकारनगर या भागातील ओढ्याजवळ असलेल्या सोसायट्यांमध्ये हे पाणी घुसले.

४. खूप वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या लोकांनाही अशा पद्धतीने ओढ्यातील पाणी सोसायट्यांमध्ये शिरून एवढा मोठा पूर आल्याचे माहिती नाही. पण बुधवारी रात्री पडणाऱ्या पावसाचा जोर जास्त असल्यामुळे ओढ्यातील पाणी खूप वेगाने बाहेर आले. आधीच उतारावरून वेगाने येणारे पाणी, त्यात वरून कोसळणारा धो धो पाऊस या स्थितीत हे पाणी ओढ्याच्या पात्राबाहेर आल्यानंतर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ओढ्यानजीक असलेल्या सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरले आणि तेथील रस्त्यावरील सर्व वस्तू वाहून जाण्यास सुरुवात झाली. दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून जाऊ लागल्या.

तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला

५. यंदाच्या मोसमात पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यातच बुधवारी रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सोयायट्यांच्या सुरक्षा भिंत कोसळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशाच एका घटनेत पाच जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. वरील परिसरात भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

६. ओढ्याच्या बाजूने झालेली अतिक्रमणे आणि नाल्यामध्ये अडकलेला कचरा यामुळे पुराचे पाणी वेगाने घरांमध्ये आणि सोसायटीमध्ये शिरल्याचे पाहायला मिळाले. अतिक्रमणे आणि ओढ्यामध्ये असलेला कचरा यामुळे पाण्याचा लोंढा वेगाने बाहेर आला.

७. पुण्याच्या दक्षिण बाजूला उंचसखल भागाचे प्रमाण जास्त आहे. काही भाग उंचावर आहे तर काही खालच्या बाजूला. इथे अनेक घरे आणि इमारतींचे बांधकाम झाले आहे. पावसाचे पाणी उंचावरून वेगाने खाली आले आणि खालील बाजूस असलेल्या इमारतींमध्ये आणि घरांमध्ये घुसले. यामुळे काही लोक वाहून गेल्याचे पाहायला मिळाले.

८. पुण्यात खूप कमी वेळेत इतका जास्त पाऊस पडल्याचे जुन्या लोकांच्याही आठवणीत नाही. त्यातच शहराच्या एका भागातच पावसाचा जोर जास्त होता. दुसऱ्या भागातून दक्षिणेकडे येणाऱ्या लोकांना इतक्या पावसाचा आणि पूरस्थितीचा अंदाजच आला नाही. यामुळेही पुराच्या पाण्यात दुचाकी गाडी घालू पाहणारे लोक वाहून गेले. अशीच एक घटना सिंहगड रस्त्यावर वडगावच्या पुलाजवळ घडली. एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून गेला.

पुण्यात पावसाने नक्की काय झालंय डोळ्याने पाहा...

९. पुराच्या पाण्यामुळे लक्ष्मीदर्शन परिसरात गजानन महाराज मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यातील गायीही वाहून गेल्या आहेत. तिथून जवळूनच आंबिल ओढ्याचा प्रवाह जातो. त्याच्या पुरामध्ये या गायी वाहून गेल्या आहेत. 

१०. रात्री ११ नंतर पावसाच्या पाण्याने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे नागरिकांची जास्त अडचण झाली. जिथे पाऊस सुरु होता तेथील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे अंधारात पाण्याचा प्रवाह कसा येतो आहे, काय घडते आहे, हे अनेक नागरिकांना कळलेच नाही.

११. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात खूप कमी वेळात एखाद्या भागात इतक्या जोरात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला नव्हता.