पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, धरणात कमी साठा

खडकवासला धरण

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे पुणेकरांना लवकरच पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला असून, पुण्याचा पाणी पुरवठा तातडीने कमी करण्याचे त्यात नमूद केले आहे.

पाणी पुरवठा विभागाने दोन पर्याय ठेवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा आणि दुसरा पर्याय म्हणजे रोज केवळ ११०० एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा आहे. पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारीच महापालिकेत बैठक घेण्यात येणार होती. पण आयुक्त सौरभ राव यांनी ती गुरुवार, २ मेपर्यंत पुढे ढकलली आहे. 

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० एप्रिलच्या अखेर खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये ६.२९ टीएमसी पाणीच शिल्लक आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे जिल्ह्यातील गावांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. त्यासाठी एक टीएमसी पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. उर्वरित ५.२९ टीएमसी पाण्यासाठ्यापैकी अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. अर्धा टीएमसी पाणी हे आषाढी वारीतील पालख्यांसाठी राखून ठेवले जाईल. उर्वरित ४.२९ टीएमसी पाणी पुण्यासाठी कसे वापरायचे, याचे नियोजन आता महापालिकेला करावे लागणार आहे. १५ जुलैपर्यंत हे पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. 

पुण्यामध्ये सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून पाण्याची मागणी वाढली आहे. याचा विचार करून पाणी पुरवठ्यात कपात करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे.