पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निघाले माहेरा वैष्णव सकल..!, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

निघाले माहेरा वैष्णव सकल ! 
सवे संतजन घेवुनिया !!
हाती टाळ वीणा पताकांचे भार ! 
करीत जयजयकार विठ्ठलाचा !!  

टाळ, मृदुंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोष करीत लाखो वैष्णवांनी आषाढी वारीने माहेरच्या ओढीने माऊलीसह श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. भागवत धर्माची पताका उंचावत महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या लाखो  वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापूरी गजबजून गेली होती. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता. पहाटेपासूनच इंद्रायणी काठ वारकर्‍यांनी फुलून गेला होता. पहाटे घंटानाद झाल्यानंतर ३ वाजता काकडा, ३.१५ ते ४.३० दरम्यान पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दूधारती करण्यात आली. पहाटे ४.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भक्ताच्या महापूजा व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. इंद्रायणीचे स्नान करून हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.  
    
सकाळी १० वाजता गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. माऊलींचा मुखवटा सजविण्यात आला होता. दुपारी २ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. नंतर मंदिराचा ताबा पोलिसांनी घेतला. सर्व भाविकांना मंदिराबाहेर काढण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर रिकामे करण्यात आले. पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता. पासधारकाशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. दुपारी २ वाजता देऊळवाड्यात दिंड्या सोडायला सुरूवात झाली.

प्रस्थान सोहळ्यासाठी रथापुढील २७ व रथामागील सुमारे २० अशा जवळपास ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला.  टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत दिंड्या देऊळवाड्यात प्रवेश करीत असताना मुख्य गाभार्‍यात मात्र माऊलींच्या प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू होती. दुपारी ३ वाजता विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविलेली पालखी आळंदीकरांनी विणा मंडपात आणली. तिला प्रतिक्षा होती ती माऊलींच्या पादुकांची. विणा मंडपात मुख्य माणकरी, दिंडीप्रमुख व फडकरी यांना प्रवेश देण्यात आला. सर्वचजण प्रस्थान सोहळ्याची आतुरतेने वाट पहात होते.

देऊळवाड्यात टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात वारकरी आनंदाने बेहोश होऊन नाचत होते. दिंड्या दिंड्यातून ज्ञानोबा तुकाराम भजनाचा ठेका धरला होता. झिम्मा, फुगडी, मनोरे, फेर धरून महिला वारकरीही सोहळ्याचा आनंद घेत होत्या. सायंकाळी ४ . ४५ वाजता देवाचा व स्वाराचा अश्व घेवून श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकारांचे आगमन झाले . 

मुख्य गाभार्‍यात प्रस्थान पूजेला प्रारंभ  

श्रींना पोशाख व आकर्षक सजावट करून वेदमंत्र घोषात माऊलींची विधीवत पूजा केली. संस्थानच्या वतीने  प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील  यांच्या हस्ते व  त्यानंतर पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली . यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल ,श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार , मालक बाळासाहेब आरफळकर , प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील, सोहळा प्रमुख योगेश देसाई , अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खा संजय जाधव, नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारती, माजी आ उल्हास पवार, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर माऊली जळगावकर, ॲड माधवी निगडे, संभाजीराजे शिंदे, संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, व्यवस्थापक माऊली वीर यांच्या मानकरी, दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते.

प्रथम सुरूवातीला शेंगदाण्याचा प्रसाद देण्यात आला. त्यानंतर फळांचा नैवेद्य माऊलींना दाखविण्यात आला. आता सर्वांनाच माऊलींच्या प्रस्थानाची प्रतिक्षा लागून राहिली होती. लाखो वैष्णवांच्या  नजरा कळसाकडे लागल्या होत्या. यावेळी माऊली नामाचा एकच जयघोष झाला आणि देऊळवाड्याबाहेर उभा राहिलेल्या लाखो भाविकांनी एकच जल्लोष केला, कळस हलला, कळस हलला. त्यानंतर  प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील व सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका  प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न केल्या.

यावेळी संस्थानतर्फे मानक-यांना पागोटे वाटप करण्यात आले. दिंडी प्रमुखांना गुरू हैबतबाबांच्यावतीने व माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर माऊली माऊली नामाच्या जयघोषात व टाळ, मृदुंगाच्या गजरात  आळंदीकरांनी विणामंडपात ठेवलेली माऊलींची पालखी मोठ्या आनंदाने खांद्यावर घेत पालखी अष्टदिशांना फिरवली.  सायंकाळी सात वाजता विणामंडपातून प्रचंड गर्दीत पालखी बाहेर आणण्यात आली. यावेळी लाखो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली. टाळ, मृदुंगाच्या गजरात व माऊली नामाच्या जयघोषात अश्‍वांसह मानाच्या दिंड्या घेऊन पालखीने मंदिरास प्रदक्षिणा घातली व हा सोहळा पहिल्या मुक्कामासाठी दर्शन मंडपाकडे मार्गस्थ झाला. नगरप्रदक्षिणा करून सोहळा दर्शन मंडपात  पोहोचला. येथे सोहळा विसावला.