पुण्यात ४२ वर्षांच्या एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या महिलेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा परदेश प्रवासाचा काहीच इतिहास नाही. तसंच तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने परदेशात प्रवास केलेला नाही. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
चिंता वाढली, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर
भारती हॉस्पिटलचे उपवैद्यकीय संचालक जितेंद्र ओसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या महिलेवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तिच्यामध्ये कोरोनाबाबतची काही लक्षणं आढळून आली त्यामुळे त्यांनी तिच्या केली. तर तिला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? तामिळनाडूत सापडला वेगळा रूग्ण
या महिलेने काही दिवसांपूर्वी वाशी येथील एका विवाहसोहळ्यात उपस्थिती लावली होती. त्याठिकाणावरुन तिला कोरोनाची लागण झाली का याचा तपास सध्या सुरु आहे. पुढील मार्गदर्शनासाठी तिचे अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती देखील ओसवाल यांनी दिली. दरम्यान, पुण्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा २३ झाला आहे. यामधील एका व्यक्तीने आयर्लंडचा प्रवास केला होता. तर दुसऱ्या रुग्णाने प्रवास केलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.