पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर स्तुतिसुमने

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

योग्यवेळी महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली आहे. चांगली वेळ जुळून आली आहे. घड्याळवाले आता आमचे पार्टनर झालेत, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम सोप्पे निश्चितच नाही. पण आम्ही हे करून दाखवणार आहोत. त्यासाठी मला आपल्या सर्वांची मदत हवी आहे, असेही आवाहन त्यांनी सर्वांना केले. यापुढे बारामतीला सारखा येत राहणार, असेही त्यांनी सांगितले.

'अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईल मात्र तसं झाले नाही'

बारामतीतील कृषि विज्ञान केंद्राने कृषिक २०२० हे प्रात्याक्षिक आधारित कृषि प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उदघाटन गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिनेता आमीर खान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची भूमी चमत्कार करणारी आहे. इथे कायम चमत्कार जन्माला येतोच. मुंबईत मी आतापर्यंत खूप प्रदर्शने बघितली. पण बारामतीतील हे प्रदर्शन वेगळे आहे. इथे प्रात्याक्षिकासह माहिती दिली जाते. नुसतं तत्त्वज्ञान सांगणारे खूप असतात. पण इथे प्रात्याक्षिकासह दाखवले जाते. जर आज मी या कार्यक्रमाला आलो नसतो, तर एका मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

'रयतेच्या राज्यासाठी शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्माची गरज नाही'

अभिमान वाटावा असे काम शरद पवार यांनी आणि त्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली त्या सर्वांनी करून दाखविली. राजकारणातील मतभिन्नता हा भाग वेगळा आहे. पण जे चांगले झाले ते नाकारणे हा करंटेपणा आहे. जग बदलतंय, नवं तंत्रज्ञान येतंय. हे जे काही सर्व सुरू आहे ते अंतिमतः दोन घास पोटात जाण्यासाठीच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे महत्त्व जास्त आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पूर्वी माळरान असलेल्या भागावर नंदनवन उभे करून दाखविणे हे सोपे काम नाही. त्यातही दर्जेदार उत्पादन घेण्याचे काम इथे सुरू आहे, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे कौतुक केले.