पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील हेल्मेट सक्तीला स्थगिती, मुख्यमंत्र्यांनी दिली सूचना

आता पुणे शहरात हेल्मेट घालण्याची सक्ती नाही.

दुचाकी स्वारांना पुणे शहरात पोलिसांच्यावतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणाऱ्या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. 

यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत. हेल्मेट सक्तीच्या मुद्यासंदर्भात बोलताना, आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. यापार्श्वभूमीवर आम्ही आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

विना हेल्मेट वाहन चालकांवर पोलीस करत असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे आणि पोलिसांची अरेरावी याबाबत त्यांच्यासमोर भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य केली.  पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात तात्काळ तशा सूचना देण्यात आल्या आहेत.